पाथरी-सोनपेठ रस्त्यावर भीषण अपघातात बसच्या खाली अडकली दुचाकी; दोघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 12:50 IST2025-07-22T12:48:57+5:302025-07-22T12:50:12+5:30
अपघात इतका भीषण होता की दुचाकी बसच्या खाली अडकलेली आहे.

पाथरी-सोनपेठ रस्त्यावर भीषण अपघातात बसच्या खाली अडकली दुचाकी; दोघांचा जागीच मृत्यू
- विठ्ठल भिसे
पाथरी ( परभणी) : पाथरी-सोनपेठ मार्गावर जैतापूरवाडीजवळ आज (दि. २२) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. दोघेही मृत पाथरी येथील इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळची पाथरी आगाराची बस ( एमएच 06 एस 8790) पाथरीहून सोनपेठच्या दिशेने सकाळी रवाना झाली. तर एका दुचाकीवर (क्र एम एच 22 ए के 1583 ) दोघेजण पाथरीकडे येत होते. जैतापूरवाडीजवळ बस आणि दुचाकीची समोरसमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील लतिफ अहमद पठाण ( 56) आणि शेख अनवर शेख नूर ( 39, दोघे राहणार इंदिरानगर, पाथरी)
यांचा जागीच मृत्यू झाला.
बसच्या खाली अडकून पडली दुचाकी
अपघात इतका भीषण होता की दुचाकी बसच्या खाली अडकलेली आहे. अपघात होताच बस रस्त्याच्या कडेला गेली. सुदैवाने बसमधील कोणाला मार लागला नाही. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी दिली आहे.