अर्थसंकल्प, शक्तीपीठ अधीसूचनेची होळी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणीत आंदोलन
By राजन मगरुळकर | Updated: March 13, 2025 15:54 IST2025-03-13T15:53:07+5:302025-03-13T15:54:34+5:30
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तत्काळ करावी, शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या शेती विरोधी धोरणाची होळी केली.

अर्थसंकल्प, शक्तीपीठ अधीसूचनेची होळी; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणीत आंदोलन
परभणी : राज्य सरकारने तीन दिवसांपूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची व शक्तीपीठ महामार्गाच्या अधिसूचनेची होळी जाळुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध केला. हे आंदोलन गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात करण्यात आले.
होळी सण म्हणजे दुष्टावर चांगल्याचा विजय असे म्हणतात. त्याच प्रमाणे या सरकारने आश्वासन देऊनही ते पाळले नाहीत. शेती मालाला हमीभाव, खरेदी केंद्र, कर्जमाफी यासह विविध विषयांचा सरकारला विसर पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांचा होळीमध्ये दहन करुन निषेध केला. सरकारने यावर लक्ष घालून शेतकरी विरोधी धोरण अवलंबू नये. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तत्काळ करावी, शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारच्या शेती विरोधी धोरणाची होळी केली. सरकारने लक्ष घालून सुधरावे अन्यथा राज्यातील शेतकरी एक दिवस सरकारचे असेच दहन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला.
यावेळी किशोर ढगे, रामप्रसाद गमे, प्रसाद गरुड, गजानन तुरे, कलीम भाई, पि.टी.निर्वल, जग्ननाथ जाधव, किशन शिंदे, कारभारी जोगदंड, विकास भोपळे, गजानन दुगाणे, सतीश दुगाणे, विठ्ठल चोखट, नामदेव काळे, दत्ता परांडे, रणजित चव्हाण आदी सहभागी झाले होते.