HHC Exam:चक्क्, इंग्रजीचा पेपर फोडून शिक्षकांनीच पुरविल्या कॉपी, ६ शिक्षकांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 13:05 IST2023-02-22T13:04:06+5:302023-02-22T13:05:34+5:30
याप्रकरणी सहा शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

HHC Exam:चक्क्, इंग्रजीचा पेपर फोडून शिक्षकांनीच पुरविल्या कॉपी, ६ शिक्षकांवर गुन्हा दाखल
- सूभाष सुरवसे
सोनपेठ ( परभणी) : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या औरंगाबाद बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरला बुधवारी पहिल्याच दिवशी सोनपेठच्या महालिंगेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना पेपरच्या कॉप्या पुरविण्याच्या उद्देशाने पेपरचे फोटो काढून काही शिक्षक त्याच्या कॉप्या बनवत असताना आढळले. त्या सहा शिक्षकां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनपेठ येथील पोलीस ठाण्यामध्ये सदरील प्रकरणातील शिक्षकांना बुधवारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. महालिंगेश्वर विद्यालयाच्या शेजारी मुंढे कॉलनीमध्ये पंचासमक्ष पथकाने पाहणी केली असता विद्यालयाचे शिक्षक बालाजी किशनराव बूलबूले, गणेश अंकुशराव जयंतपाळ, भास्कर बापूराव तिरमले हे त्यांच्या मोबाईलवर इंग्रजीचा पेपर घेऊन मुलांना कॉपी पुरविण्याकरिता कॉपी तयार करताना मिळून आले. त्यावरून सोनपेठचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे यांनी चौकशी केली असता शिक्षक रमेश मारुती शिंदे, सिद्धार्थ सावजी सोनाळे यांच्या मोबाईलवरून पेपर पाठविला असल्याचे निदर्शनास आले तसेच उपकेंद्र संचालक कालिदास रामकृष्ण कुलकर्णी यांनी पेपरच्या कॉप्या पुरविणे कामी मदत केल्याचे निदर्शनास आले.
केंद्र संचालकांनी दिली फिर्याद
सोनपेठ पोलिसांनी या प्रकाराची तत्काळ दखल घेत शिक्षण विभागाला व शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी कळविले. त्यावरून गट शिक्षण अधिकारी शौकत पठाण यांनी केंद्र संचालक लहाने यांना आदेशित केले. त्यावरून केंद्र संचालक गोविंद लहाने यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून सोनपेठ ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सोनपेठ ठाण्यात महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ कलम ५, ७, ८ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक रागसुधा, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, अंमलदार भगवान मुंडे, भगवान पवार, दिलीप निलपत्रेवार, नारायण लटपटे, कुंडलिक वंजारे, मनोज राठोड, संजय रासवे, शिवाजी जाधव यांनी केली.