आरोग्य कर्मचारी बिनधास्त; पीपीई किटचा वापर घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:17 IST2021-05-09T04:17:48+5:302021-05-09T04:17:48+5:30
परभणी : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने दिवसभर वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांवर उपचार करावे लागत आहे. वारंवार पीपीई कीट घालणे ...

आरोग्य कर्मचारी बिनधास्त; पीपीई किटचा वापर घटला
परभणी : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने दिवसभर वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांवर उपचार करावे लागत आहे. वारंवार पीपीई कीट घालणे आणि काढणे यात जाणारा वेळ आणि किटमुळे वाढलेली उष्णता लक्षात पीपीई किटचा वापर टाळला जात आहे.
कोरोनाबाधित रुग्णांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांना संसर्ग पोहोचू नये, यासाठी पीपीई किट घालून त्यांनी रुग्णावर उपचार करावेत, असे निर्देश आहेत. मात्र किट अर्धा तासही घातली तरी वैद्यकीय अधिकारी घामाघूम होत आहेत. त्याचप्रमाणे किट काढणे आणि घालणे यासाठी किमान अर्ध्या तासाचा वेळ लागत आहे. सध्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रुग्णांचा कॉल आल्यानंतर किट घालून रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ वाचविण्यासाठी अनेक वैद्यकीय अधिकारी किट न घालताच रुग्णांची तपासणी करतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सध्या कमी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. या रुग्णांना ठरावीक अंतरावरून तपासल्यानंतर संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. ही बाब पटल्याने अनेक जण पीपीई किटचा वापर टाळत आहेत.
एकंदरच मागील कोरोना लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून पीपीई किटचा वापर होत नसल्याची बाब प्रकर्षाने जाणवत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना पीपीई कीट वापर करणे बंधनकारक करणे गरजेचे झाले आहे.
जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पीपीई किट आहेत; परंतु पीपीई किट घातल्यानंतर डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. काही जणांना अंगावर फोड येत आहेत. त्यामुळे वारंवार सूचना करूनही अनेक जण पीपीई किटचा वापर करत नाहीत.
वैद्यकीय अधिकारी
बहुतांश रुग्णांना कोरोनाची लक्षणे कमी असतात. अशावेळी पीपीई कीट घातले नाही तरी चालते. मात्र, गंभीर रुग्णांच्या जवळ जाऊन उपचार करावे लागतात. अशा रुग्णांवर उपचार करताना पीपीई कीट घातले जाते.
वैद्यकीय अधिकारी
मास्क आणि हॅन्डग्लोजच्या साह्याने उपचार केल्यास कोरोनाचा संसर्ग होत नाही. त्यासाठी पीपीई किट घालावेच लागते अशातला भाग नाही. त्यामुळे किटचा वापर कमी झाला आहे.
आरोग्य कर्मचारी
सध्या अनेक रुग्ण कमी लक्षणे असणारी आहेत. या रुग्णांना दूर अंतरावरून आम्ही विचारपूस करतो. त्यामुळे पीपीई कीट घालण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे आता पीपीई किट न घालता उपचार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.