मध्यम प्रकल्पातील निम्मा पाणीसाठा संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:16 IST2021-03-28T04:16:56+5:302021-03-28T04:16:56+5:30
परभणी : मागच्या पाच महिन्यात मध्यम प्रकल्पातील पन्नास टक्के पाणीसाठा उपसा करण्यात आला असून सध्या केवळ ५० टक्केच पाणी ...

मध्यम प्रकल्पातील निम्मा पाणीसाठा संपला
परभणी : मागच्या पाच महिन्यात मध्यम प्रकल्पातील पन्नास टक्के पाणीसाठा उपसा करण्यात आला असून सध्या केवळ ५० टक्केच पाणी या प्रकल्पांमध्ये शिल्लक राहिले आहे. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईचे नियोजन करताना या पाण्याचा काटेकोर वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मागील वर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात तर अतिवृष्टी झाली होती. या पावसामुळे जिल्ह्यातील लघु तलाव, मध्यम प्रकल्प तुडुंब भरले होते. गंगाखेड आणि जिंतूर या तालुक्यांमध्ये प्रकल्पांची संख्या अधिक आहे. गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पात ३४.०८ दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. या प्रकल्पात सध्या २१.३०८ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून, त्यात १४.३६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. या पाणीसाठ्याची टक्केवारी ५३ टक्के एवढी आहे. तर जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पमध्ये २८.८२० दलघमी पाणी साठवण्याची क्षमता असताना प्रत्यक्षात १५.८३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामध्ये ११.९१ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. दोन प्रकल्पात मिळून २७.२७ दलघमी पाणी उपलब्ध असून, त्याची टक्केवारी केवळ ५० टक्के एवढी आहे.
उन्हाळ्याला आता प्रारंभ झाला असून, ग्रामीण भागामध्ये पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय उन्हाळी हंगामातही पिके घेतली जातात. त्यामुळे सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. मध्यम प्रकल्पातील ५० टक्के पाण्याचे नियोजन करुन ते काटेकोरपणे वापरले तर ते संपूर्ण उन्हाळाभर पुरू शकेल. त्यामुळे प्रशासनाला आता पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बंधाऱ्यातही पाणीसाठा आटला
जिल्ह्यात गोदावरी नदीवर चार ठिकाणी बंधारे उभारण्यात आले आहेत; परंतु या बंधाऱ्यात ही पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध नाही. पाथरी तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल या दोन बंधाऱ्यांचा अपवाद वगळता इतर दोन बंधाऱ्यांमध्ये पाणी नसल्याने या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याला गेट नसल्याने पाणीसाठा झाला नाही तर पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातील पाणी नांदेडसाठी आरक्षित करण्यात आल्याने हे पाणीही मागील महिन्यांमध्ये सोडून दिले आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठा शिल्लक नसल्याने संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन नियोजन करावी लागणार आहे.