पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची बदनामी, माजी आमदाराच्या पुतण्यास पोलिसांनी उचलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:54 IST2025-08-06T17:53:44+5:302025-08-06T17:54:14+5:30
जिंतूर पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा ; चौकशीनंतर नोटीस देऊन सोडले

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची बदनामी, माजी आमदाराच्या पुतण्यास पोलिसांनी उचलले
जिंतूर (जि.परभणी) : फेसबुकवर विष्णू नागरे या नावाने अकाउंट तयार करून त्यावर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर टाकल्याच्या प्रकरणात २८ जुलैला जिंतूर पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. मात्र, हा पोस्ट करणारा पृथ्वीराज भांबळे हा माजी आ.विजय भांबळे यांचा पुतण्या असल्याचे समोर आले. त्याला मुंबईत ताब्यात घेवून परभणी पोलिस अधीक्षक कार्यालयात चौकशी केली. नोटीस देवून सोडून दिले.
सदरील प्रकार २६ जुलै रोजी दुपारी जिंतूर येथे फिर्यादी शिवाजी दत्तराव कदम यांच्या निदर्शनास आला. यानंतर त्यांनी २८ जुलै रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात संबंधित फेसबुक अकाउंटधारक विष्णू नागरे याच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाहीसाठी तक्रार दिली. यामध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर पोस्ट केला होता. सदरील प्रकरणात स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी जिंतूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्याकडे निवेदनसुद्धा दिले होते. या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या सायबरचा विश्लेषणात्मक तपास करून मुंबई येथून पृथ्वीराज भांबळे यास पुराव्याअंती चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची चौकशी करून त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले. बुधवारी याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांनीसुद्धा पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर केले. संबंधितावर कारवाईची मागणी केली.
भांबळे-बोर्डीकर वाद पेटतोय
जिंतूर विधानसभेत विद्यमान आ.मेघना बोर्डीकर यांच्याविरोधात माजी आ. विजय भांबळे हे मागील काही दिवसांपासून आक्रमक दिसत आहेत. दोघेही महायुतीत आहेत. मात्र ते एकमेकांविरुद्धची एकही संधी सोडत नाहीत. शिवाय कार्यकर्त्यांमध्येही समाज माध्यमांवर डिजिटल युद्ध केले जात आहे.