दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्रीडापाठोपाठ रेखाकलेचे गुण गेले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:18 IST2021-04-01T04:18:06+5:302021-04-01T04:18:06+5:30
परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील प्रावीण्याबद्दल मिळणारी गुणांची सवलत यंदा न देण्याचा निर्णय झाल्यानंतर आता ...

दहावीच्या विद्यार्थ्यांचे क्रीडापाठोपाठ रेखाकलेचे गुण गेले!
परभणी : कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील प्रावीण्याबद्दल मिळणारी गुणांची सवलत यंदा न देण्याचा निर्णय झाल्यानंतर आता रेखाकला परीक्षेतील विद्यार्थ्यांनाही या गुणांवर पाणी सोडावे लागणार आहे.
विद्यार्थ्यांमधील कला गुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चित्रकला विषयासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांत यश संपादन करणाऱ्या दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांना चित्रकला परीक्षेत मिळणाऱ्या ग्रेडनुसार दहावीच्या गुणांमध्ये वाढीव गुण दिले जातात. मागील वर्षी जिल्ह्यात ही परीक्षा घेण्यात आली. अनेक विद्यार्थी कला क्षेत्रात नैपुण्य दाखवितात. क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच कला क्षेत्रात या विद्यार्थ्यांनी मिळविलेले नैपुण्याची दहावी इयत्तेच्या गुणांमध्ये नोंद घेतली जात होती. मात्र यावर्षी कोरोनाचा संसर्ग असल्याने हे गुण न देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.
मागील वर्षी जिल्ह्यातील अकरा हजार विद्यार्थ्यांनी इलेमिंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षा दिल्या होत्या. या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचे कौतुक करण्यासाठी हे गुण देणे आवश्यक आहे. शासनाच्या या निर्णयाविषयी कलाध्यापक संघासह विद्यार्थ्यांनीही शासनाकडे पाठपुरावा सुरू केला असून, रेखाकलेचे गुण विद्यार्थ्यांना अदा करावेत, अशी मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे तर त्यांना गुण देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी हे गुण दिले जातात. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना या गुणांमुळे प्रोत्साहन मिळते. रेखा कला परीक्षेचे गुण तर विद्यार्थ्यांना द्यावेतच. शिवाय क्रीडाच्या १० गुणांप्रमाणेच या या परीक्षेसाठीही १० गुण दिले जावेत.
माधव घयाळ, कलाध्यापक
शासनाने यावर्षी शासकीय रेखा कला परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या तयारीवर पाणी फेरले जाणार आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षी ज्या विद्यार्थ्यांंचे प्रस्ताव दाखल केले आहेत, त्याचाही शासनाने विचार केला नाही. हा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हक्काचे गुण त्यांना देऊन कलेला प्रोत्साहन दिले पाहिजे.
के.एस. लगड, कलाध्यापक