सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली: राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:26 IST2025-05-03T16:25:49+5:302025-05-03T16:26:10+5:30
सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे खोटे आश्वासन दिल्याने कित्येक शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त

सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली: राजू शेट्टी
परभणी : मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी शेतकऱ्यांना खोटी कर्जमाफीची आश्वासने दिली. त्यामुळे दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. फडणवीस सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यामुळे कित्येक शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याची टीका करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथील शेतकरी सचिन जाधव व त्यांच्या सात महिन्यांच्या गरोदर पत्नीने आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 'शेतकरी आत्महत्या आक्रोश पदयात्रा' काढण्यात आली. ही पदयात्रा बुधवारी माळसोन्ना येथून सुरू होऊन १ मे रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचली. यावेळी सचिन जाधव यांच्या दोन्ही मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. राजू शेट्टी यांनी महायुती सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या काळात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचा लेखाजोखा सरकारने सादर करावा. त्यातून त्यांच्या अपयशाचा आरसा दिसून येईल, असे त्यांंनी म्हटले.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. देशात ६.५० लाख हेक्टर व राज्यात ३.५० लाख हेक्टर शेती क्षेत्र कमी झाले आहे. उद्योगपतींच्या फायद्यासाठी राबवली जाणारी आयात-निर्यात धोरणं, सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, पिकविमा कंपन्यांची नफेखोरी, दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने निवडणुकीत दिलेले ‘संपूर्ण कर्जमुक्ती’चे आश्वासन तातडीने पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या पदयात्रेत युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, प्रकाश पोपळे, अजित पोवार, सचिन शिंदे, कृष्णा साबळे, माऊली मुळे, डॉ. बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील यांच्यासह पदाधिकारी व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पदयात्रेत सहभागी होते.