खूषखबर, परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदांच्या निर्मितीस मान्यता
By राजन मगरुळकर | Updated: February 16, 2023 17:04 IST2023-02-16T17:04:20+5:302023-02-16T17:04:27+5:30
परभणी येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याकरिता आवश्यक पद निर्मिती बाबत शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने बुधवारी शासन निर्णय काढला आहे.

खूषखबर, परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदांच्या निर्मितीस मान्यता
परभणी : परभणी येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याकरिता आवश्यक पद निर्मिती बाबत शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने बुधवारी शासन निर्णय काढला आहे. याबाबत चार टप्प्यात लागणारी ४४८ पदे निर्माण करण्यास या विभागाने मान्यता दिली आहे. हे आदेश सहसचिव शिवाजी पाटणकर यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहेत.
परभणीत शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास दोन मार्च २०२२ च्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार मान्यता देण्यात आली. याबाबत २८ मार्चला शासन निर्णय काढण्यात आला. सदरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करिता गट-अ ते गट ड मध्ये एकूण ४४८ पदे निर्मिती करण्यास, भरण्यास व त्यापोटी येणाऱ्या ९७ कोटी ६० लाख इतक्या अंदाजे खर्चास परवानगी देण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवश्यक पदांच्या पदनिर्मितीस मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
अशी राहणार गटनिहाय पदे
त्यानुसार गट अ ते गट क मधील नियमित १८५ पदे, विद्यार्थी पदे ५९ त्याचप्रमाणे गट क (काल्पनिक पदे-बाह्य स्त्रोतांनी) १३९ पदे, गट ड मधील काल्पनिक पदे व बाह्यस्त्रोतांनी मिळून ६५ पदे अशी एकूण ४४८ पदे चार टप्प्यात निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
या पदांची होणार निर्मिती
अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, मुख्य प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, सांख्यिकी अधिव्याख्याता, प्रशासकीय अधिकारी, लघु लेखक, ग्रंथपाल, कार्यालयीन अधीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, समाजसेवा अधीक्षक, रोखपाल, वरिष्ठ सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, इसीजी तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, लघुलेखक, प्रक्षेपक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक यांच्यासह अन्य पदे भरली जाणार आहेत.