लॉकडाऊनमध्येही दे दारू; दुकाने बंद असतानाही विक्री जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:19 IST2021-05-25T04:19:53+5:302021-05-25T04:19:53+5:30
परभणी : कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने सर्व बाजारपेठा बंद असल्या तरी दारूची विक्री मात्र वाढलेली आहे. मागील ...

लॉकडाऊनमध्येही दे दारू; दुकाने बंद असतानाही विक्री जोरात
परभणी : कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्याने सर्व बाजारपेठा बंद असल्या तरी दारूची विक्री मात्र वाढलेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विदेशी दारू आणि वाइनची विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे.
मद्य विक्रीतून जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल प्राप्त होतो. जिल्ह्यात विविध भागांत परवानाधारक आणि किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून मद्यविक्री केली जाते. मागील वर्षात आणि यावर्षीदेखील जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संकट निर्माण झाले होते. कोरोनाचा अटकाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व व्यवहार बंद केले. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल महिन्यासाठी थांबली होती.
व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मात्र यात दारूविक्री अपवाद ठरली आहे. एकीकडे बाजारपेठ आणि व्यवहार बंद असतानाही दुसरीकडे दारूची विक्री मात्र जोरात झाल्याचे दिसून आले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशी दारूची विक्री ४४ हजार ८९ लिटरने घटली आहे, तर विदेशी दारूची विक्री २ हजार ८४९ लिटरने वाढल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे वाइनच्या विक्रीतही वाढ झाली आहे. यावर्षी ४६ लाख ८७ हजार ६५८ लिटर देशी दारूची विक्री झाली आहे, तर १६ लाख ७६ हजार १९६ लिटर विदेशी दारूची विक्री झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दारू विक्रीचे हे प्रमाण पाहता इतर बाजारपेठांतील व्यवहार ठप्प असले तरी दारू विक्री जोरात असल्याचे दिसून येत आहे.
बीअरची विक्री घटली तर वाइनची विक्री वाढली
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी बीअर विक्री मोठ्या प्रमाणात घटली आहे. मागील वर्षी १४ लाख २७ हजार ४५८ लिटर बीअरची विक्री झाली होती. त्या तुलनेत यावर्षी ९ लाख ३१ हजार ७५६ लिटर बीअरची विक्री झाली आहे. ३४ टक्क्यांनी बीअर विक्रीत घट झाली आहे, तर दुसरीकडे वाइनची विक्री मात्र मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी १२ हजार ७८१ लिटर वाइन विक्री झाली होती. यावर्षी २२ हजार ७ लिटर वाइनची विक्री झाली आहे. वाइन विक्रीत ९ हजार २३७ लिटरने वाढ झाली असून, हे प्रमाण ७२ टक्के एवढे आहे.
लाखो रुपयांची दारू जप्त
संचारबंदीमुळे जिल्ह्यात बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. असे असतानाही चोरून दारू विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरुद्ध वेळोवेळी कारवाया केल्या. या वर्षभरात कोट्यवधी रुपयांची दारू दोन्ही विभागांनी जप्त केली आहे.
महसुलाला दारूचा आधार
बाजारपेठा बंद असल्यामुळे जिल्ह्यातील आर्थिक उलाढाल ठप्प आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला वेगवेगळ्या मार्गातून मिळणारा महसूलही बंद पडला आहे; परंतु दारू विक्रीतून प्रशासनाला मोठा महसूल मिळत असल्याने मागील वर्षी आणि यावर्षीदेखील जिल्हा प्रशासनाने घरपोच दारू विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाचा महसूल वाढविण्यात दारूचा मोठा हातभार आहे.