येलदरीच्या पाण्यातून ४६.१४ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती; महसुलात १४ कोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 07:15 PM2020-10-23T19:15:55+5:302020-10-23T19:18:45+5:30

या धरणाच्या इतिहासात प्रथमच सलग ७२ दिवस  पाण्यावर वीज निर्मिती करण्यात आली आहे.

Generation of 46.14 million units of electricity from Yeldari Dam; 14 crore in revenue | येलदरीच्या पाण्यातून ४६.१४ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती; महसुलात १४ कोटींची

येलदरीच्या पाण्यातून ४६.१४ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती; महसुलात १४ कोटींची

googlenewsNext
ठळक मुद्देराज्याच्या तिजोरीत महसुलाची भर६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

येलदरी : जिल्ह्यासाठी वरदान लाभलेल्या येलदरी येथील प्रकल्पातून ७ महिन्यांमध्ये ४६.१४ दशलक्ष युनिट विजेची निर्मिती झाली असून, याद्वारे राज्याच्या तिजोरीमध्ये १४ कोटी रुपयांच्या महसूलाची भर या सिंचन प्रकल्पाने घातली आहे.

जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पाने परभणीसह हिंगोली आणि नांदेड या दोन जिल्ह्यांमधील अनेक शहरे आणि गावांची तहान भागविली आहे. शिवाय लाखो हेक्टर क्षेत्र सिचंनाखाली आले आहे. यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे येथील वीज निर्मित प्रकल्प पूर्णक्षमतेने सुरू करण्यात आला. एप्रिल  महिन्यापासूनच प्रकल्पाची वीज निर्मिती सुरू करण्यात आली आहे. मध्यंतरी हा प्रकल्प बंद होता; परंतु, १२ ऑगस्ट रोजी येलदरी धरण १००टक्के भरल्याने अतिरिक्त होणारे पाणी वीज निर्मिती प्रकल्पातून सोडण्यात आले. लॉकडाऊन आणि कमी मनुष्यबळ असतानाही या प्रकल्पातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वीज निर्मितीचे केलेले काम कौतुकास्पद ठरत आहे. १ एप्रिल ते २२ ऑक्टोबर या ७ महिन्यांच्या काळात ४६.१४ दशलक्ष युनिट एवढ्या मोठ्या प्रमाणात विजेची निर्मिती करण्यात आली असून, राज्याच्या तिजोरीत १४ कोटी रुपयांची भर घातली आहे.

महानिर्मितीचे मुख्य अभियंता ए.एस. कुलकर्णी, नाशिक येथील अधीक्षक अभियंता राजेंद्र कुमावत, कार्यकारी अभियंता बी.एम. डांगे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.के. रामदास यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अभियंते, तांत्रिक कर्मचारी, कंत्राटी कामगार यांनी अखंडीतपणे हे केंद्र सुरू ठेवले. त्यामुळे या धरणाच्या इतिहासात प्रथमच सलग ७२ दिवस  पाण्यावर वीज निर्मिती करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
येलदरी येथील जल विद्युत प्रकल्पाने राज्याच्या तिजोरीत मोठा महसूल जमा केला असला तरी या प्रकल्पाला कर्मचाऱ्यांचा वाणवा आहे. प्रकल्पासाठी कर्मचाऱ्यांची एकूण ५६ पदे मंजूर आहेत. प्रत्यक्षात २५ कर्मचाऱ्यांवर हा प्रकल्प चालविला जात आहे. विशेष म्हणजे वीज निर्मिती केंद्राची उभारणी होवून ५२ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यावेळी बसविलेली यंत्रणा आजही कार्यरत आहे. यंत्रणा जुनी झाल्यानंतर तिची क्रय शक्ती कमी होते. मात्र येथील वीज निर्मिती केंद्राने स्थापित क्षमतेपेक्षा अधिक वीज निर्मिती करून वेगळेपण सिद्ध केले आहे.

६० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली
येलदरी प्रकल्पाला मराठवाड्यात अनन्य साधारण महत्व आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील शेत जमिनीचे सिंचन होणार आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यातील मोठ्या शहरासह २५० हून अधिक गावांना वर्षभर पाणी पुरवठा येथून होतो.
 

Web Title: Generation of 46.14 million units of electricity from Yeldari Dam; 14 crore in revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.