नेत्यांना गावबंदी, सोनपेठमध्ये आमदार सुरेश वरपुडकरांची गाडी अडविली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 17:46 IST2023-10-26T17:46:33+5:302023-10-26T17:46:53+5:30
छत्रपती शिवाजी चौकात त्यांची गाडी सकल मराठा समाज बांधवांनी अडविली.

नेत्यांना गावबंदी, सोनपेठमध्ये आमदार सुरेश वरपुडकरांची गाडी अडविली
सोनपेठ : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जिल्हाभरात आंदोलन सुरु आहे.अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.दरम्यान, आज दुपारी सोनपेठ येथे आ. सुरेश वरपुडकर यांचे वाहन सकल मराठा समाज बांधवांनी अडविले.
अंतरवाली सराटी येथे सभेसाठी गेलेल्या भगवान मदनराव रोडे ( ४५) याचा अपघात झाला होता. उपचारादरम्यान भगवान रोडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास आ. सुरेश वरपुडकर सोनपेठ येथे आले. छत्रपती शिवाजी चौकात त्यांची गाडी सकल मराठा समाज बांधवांनी अडविली. मराठा आरक्षणाचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडावा, मराठा आरक्षणासाठी राजीनाम्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.