गंगाखेड हादरले; शिक्षकाने पत्नी, मुलीसह रेल्वेखाली संपवले जीवन

By राजन मगरुळकर | Updated: November 28, 2024 18:01 IST2024-11-28T18:00:46+5:302024-11-28T18:01:49+5:30

गंगाखेड शहरानजीक हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने खळबळ 

Gangakhed in shock; The teacher ended his life under the train along with his wife and daughter | गंगाखेड हादरले; शिक्षकाने पत्नी, मुलीसह रेल्वेखाली संपवले जीवन

गंगाखेड हादरले; शिक्षकाने पत्नी, मुलीसह रेल्वेखाली संपवले जीवन

- प्रमोद साळवे 
गंगाखेड (जि.परभणी) :
शहरातील एका विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकाने पत्नी व मुलीसह रेल्वे मालगाडी खाली आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली. गंगाखेड रेल्वे स्थानकापासून धारखेड शेत शिवारात गुरुवारी दुपारी ३ वाजता घटना घडली आहे. 

मसनाजी सुभाष तुडमे असे मयत शिक्षकाचे नाव आहे. याबाबतची अधिकृत माहिती अशी की, गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास येथील रेल्वे स्थानकाशेजारील गोदावरी नदी पूलाच्या बाजूस धारखेड शेतशिवारात तीन जणांनी आत्महत्या केल्याचे समजताच घटनास्थळी गावकऱ्यांनी गर्दी केली. 

उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे, उपनिरीक्षक असेफ शेख, जमादार दीपक वाहूळ आदींसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावले. घटनास्थळी तिघांचे शव छिन्नविछिन्न अवस्थेत पडले होते. पोलिसांना संबंधित मयताच्या खिशातून मोबाईल, पांढरा रुमाल व ३०० रुपये नगदीसह दुचाकीची चावी मिळाली. मोबाईल कॉल डिटेल्स काढल्यानंतर शेवटचा कॉलचे डिटेल्स घेतल्यानंतर संबंधित मयत हा शहरातील एका विद्यालयात माध्यमिक शिक्षक असून मसनाजी सुभाष तुडमे असे त्याचे नाव असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. 

कारण अद्याप अस्पष्ट
संबंधित मयत शिक्षकाने स्वतःच्या पत्नी व मुलीसह रेल्वेखाली आत्महत्या केल्याने घटनेचे गांभीर्य वाढले. या घटनेचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. घटनास्थळी संबंधित विद्यालयाच्या शिक्षकांनी धाव घेतली असून पुढील तपास अंती घटनेची अधिकृत माहिती प्राप्त होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Gangakhed in shock; The teacher ended his life under the train along with his wife and daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.