शेतातील विद्युत मोटार चोरणारी टोळी ताब्यात; चार गुन्हे झाले उघड
By राजन मगरुळकर | Updated: March 15, 2025 19:43 IST2025-03-15T19:43:34+5:302025-03-15T19:43:59+5:30
चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे

शेतातील विद्युत मोटार चोरणारी टोळी ताब्यात; चार गुन्हे झाले उघड
परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पाण्याच्या विद्युत मोटर चोरी गेल्याच्या घटनेमध्ये दाखल गुन्ह्यात स्थानिक गुन्हा शाखेने तपासातून चार आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये एकूण चार गुन्हे उघड झाले आहेत.
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी चोरीच्या घटनांचा तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हा शाखेला दिल्या. विविध पथके तयार करून गुन्ह्याची माहिती काढली जात होती. शुक्रवारी पांडू गुलाब काळे (रा.मंगरूळ, ता.मानवत) हा त्याच्या राहत्या घरी व श्रावण अण्णा काळे (रा.तांबसवाडी, ता.परभणी) हा त्याच्या शेतात असल्याची माहिती मिळाल्यावरून अधिकारी, अंमलदारांनी दोन्ही ठिकाणी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. साथीदार संतोष सचिन पवार (रा.मंगरूळ) याच्यासोबत गुन्हा केल्याचे सांगितले. त्यास बाळू काळेच्या आखाड्यावरून ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सपोनि. राजू मूत्येपोड, उपनिरीक्षक अजित बिरादार, गोपीनाथ वाघमारे, चंदन परिहार, अंमलदार मधुकर चट्टे, हनुमंत जक्केवाड, निलेश भुजबळ, सुग्रीव केंद्रे, जमीर फारुकी, रवी जाधव, हुसेन पठाण, मधुकर ढवळे संजय घुगे यांनी केली.
३५ हजारांचा मुद्देमाल जप्त
गुन्ह्यातील मुख्य वायर व स्टार्टर हे साहित्य विशाल अंबरसिंह ठाकुर यास भंगारचे भावात विकल्याची माहिती दिली. त्यावरून सर्व चार आरोपींना व आरोपींनी मोटार विकून मिळवलेले ३५ हजार असा मुद्देमाल तपास कामी मानवत ठाण्यात सादर केला. याद्वारे मानवत, दैठणा, गंगाखेड येथील चार गुन्हे उघड झाले.