संचारबंदी डावलून नागरिकांचा मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST2021-04-02T04:17:17+5:302021-04-02T04:17:17+5:30
परभणी : वाढीव संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी आदेश डावलत शहरातील रस्त्यांवर मुक्तसंचार केला. जिल्ह्यातील बाजारपेठ मात्र आठव्या दिवशीही बंद ...

संचारबंदी डावलून नागरिकांचा मुक्त संचार
परभणी : वाढीव संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी आदेश डावलत शहरातील रस्त्यांवर मुक्तसंचार केला. जिल्ह्यातील बाजारपेठ मात्र आठव्या दिवशीही बंद राहिल्याने या कागदोपत्री संचारबंदीविषयी व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरात जागोजागी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २४ मार्च ते १ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी जाहीर केली होती. ही संचारबंदी संपण्यापूर्वीच बुधवारी नव्याने आदेश काढून पुन्हा १ ते ५ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली. विविध पक्ष, संघटना, व्यापारी आणि नागरिकांचा या संचारबंदीला विरोध असतानाही प्रशासनाने मात्र संचारबंदी लागू केली. त्यामुळे या संचारबंदीची कडक अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा होती. गुरुवारी शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त नियुक्त केला होता. मात्र, रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना कोणतीही विचारपूस झाली नाही किंवा गर्दी हटविण्यासाठी कुठलीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे दिवसभर नागरिकांचा शहरात मुक्त वावर पहावयास मिळाला. त्यामुळे संचारबंदीऐवजी दुकान बंदीचा अनुभव गुरुवारी देखील आला.
कोट्यवधींची उलाढाल ठप्प
मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील बाजारपेठ पूर्णतः बंद आहे. जिल्ह्यात दररोज साधारणतः ५० कोटी रुपयांची उलाढाल होते. मागील आठ दिवसांपासून ही उलाढाल ठप्प आहे. मागील वर्षीच्या कोरोनामुळे आधीच आर्थिक संकट उभे ठाकले असताना दुसरीकडे संचारबंदीने बाजारपेठ बंद राहिल्याने या आर्थिक नुकसानीत आणखी भर पडली आहे.