शेतकऱ्यांशी दगा! २ किलो कमी वजन दाखवून विमा बुडवण्याचा डाव, कंपनीच्या दोघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:27 IST2025-10-14T17:25:43+5:302025-10-14T17:27:23+5:30
शेतकऱ्यांना विमा नाकारण्यासाठी बेकायदेशीर वजन काट्याचा वापर, विमा कंपनीच्या प्रतिनिधीचा प्रताप

शेतकऱ्यांशी दगा! २ किलो कमी वजन दाखवून विमा बुडवण्याचा डाव, कंपनीच्या दोघांवर गुन्हा
- मारोती जुंबडे
परभणी: शेतकऱ्यांना विमा लाभ नाकारण्यासाठी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पीक कापणी प्रयोगावेळी बेकायदेशीर वजन काटा वापरल्याचा धक्कादायक प्रकार पालम तालूक्यातील खरब धानोरा येथे १४ ऑक्टोंबर रोजी उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध पालम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालम तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,१३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी खरब धानोरा येथे खरीप हंगामातील सोयाबीन पिक कापणी व सुकवणी प्रयोग घेण्यात आला. हा प्रयोग ग्रामपंचायत अधिकारी अच्युत भालेराव यांच्या मार्फत पार पडला. प्रयोगावेळी विमा कंपनीचे प्रतिनिधी अनिकेत शेरे (रा. नालंदा नगर, नांदेड) व रणदीप भालेराव (रा. पंचशील नगर, परभणी) उपस्थित होते. प्रयोगानंतर गट क्रमांक ४४/२ मधील सोयाबीन धान्याचे वजन कंपनी प्रतिनिधींच्या काट्याने घेतले असता ते ५ किलो इतके आले. मात्र ग्रामस्थ सदस्य भास्कर कऱ्हाळे यांनी वजनाबाबत शंका उपस्थित केल्याने ग्रामपंचायतीमार्फत दुसरा काटा आणून पुन्हा वजन करण्यात आले असता ते ३ किलो इतके आढळले.
दोन किलोचा फरक
याबाबत तालुका विमा समिती अध्यक्षा तहसीलदार उषाकिरण श्रिंगारे, गटविकास अधिकारी उदयसिंह शिसोदे व कृषी अधिकारी संतोष भालेराव यांच्या उपस्थितीत काट्यांची तपासणी करण्यात आली. त्यात वजनात मोठा फरक असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर वजन मापे निरीक्षक संजय धुमाळे यांच्याकडून काट्यांची वैज्ञानिक तपासणी करण्यात आली. त्यांच्या अहवालानुसार कंपनीचा काटा सदोष असून वजनात १.९७७ किलोचा फरक आढळला आहे.
विमा नाकारण्यासाठी कट
या बेकायदेशीर प्रयोगामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन त्यांना विमा मदत मिळू नये यासाठी जाणूनबुजून प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळेवर उघड झाला. या बेकायदेशीर प्रयोगामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन त्यांना विमा मदत मिळू नये, यासाठी जाणूनबुजून प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळेवर उघड झाला. या प्रकारामुळे तालुका कृषी विभाग व ग्रामस्तरीय विमा समितीने ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडच्या दोन्ही प्रतिनिधींविरुद्ध मंगळवारी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.