Parabhani: जनावरांचा फडशा पाडल्यानंतर वन विभाग बिबट्याच्या मागावर, बसविले ट्रॅप कॅमेरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:20 IST2025-12-05T16:19:26+5:302025-12-05T16:20:01+5:30
रेनाखळी शिवारात दहशत कायम, वन विभाग ॲक्शन मोडवर येत तत्काळ तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवून बिबट्याच्या माग काढला जात आहे.

Parabhani: जनावरांचा फडशा पाडल्यानंतर वन विभाग बिबट्याच्या मागावर, बसविले ट्रॅप कॅमेरे
पाथरी (जि. परभणी ) : रेणाखळी शिवारात बिबट्याने दोन जनावरांचा फडशा पाडल्याच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून शिवारात बिबट्या कुठेच आढळून आला नसल्याने वन विभाग ॲक्शन मोडवर येत तत्काळ तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवून बिबट्याच्या माग काढला जात आहे.
पाथरी तालुक्यातील रेनाखळी शिवारात संदीपान अंबादास श्रावणे, प्रमोद भास्करराव हरकळ यांच्या शेत आखाड्यावरील दोन जनावरांचा २७ व ३० नोव्हेंबरला बिबट्याने फडशा पाडल्याची घटना घडली होती. घटनेनंतर शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वन परिक्षेत्राधिकारी एच. एन. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अंकुश जाधव, एस. जी. शिंदे, वनमजूर जनार्दन राठोड, पांडू वाघया मोहिमेत अंकुश जाधव, एस. जी. शिंदे, वनमजूर जनार्दन राठोड, पांडू वाघ यांनी घटनास्थळाची पाहणी करून बिबट्या पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली. मागील चार दिवसांपासून वन विभागाकडून शोधमोहीम राबविली जात असून, बिबट्याचा शोध लागला नाही. त्यामुळे वनविभागाने पगमार्गच्या आधारे तीन ठिकाणी कॅमेरे लावले, तर दुसरीकडे चार दिवसांनंतरही बिबट्याचे दर्शन झाले नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण असून, लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
बिबट्या की तडस?
बिबट्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, ट्रॅप कॅमेऱ्यामधून मिळणाऱ्या चित्रांनंतर खरोखर बिबट्या होता की तडस? याबाबतची अंतिम स्पष्टता येणार आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.
वन विभागाचे आवाहन
शेतकरी व रहिवाशांनी सावधगिरी बाळगावी, रात्री एकटे शेतात जाणे टाळावे, जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, कॅमेऱ्यातील चित्रांमधून प्राण्यांची खरी ओळख निश्चित होईल आणि त्यानुसार पुढील योजना आखली जाईल, असे सांगण्यात आले.