पूर, पीकविम्याच्या प्रश्नावर भाकप करणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:22 IST2021-09-14T04:22:03+5:302021-09-14T04:22:03+5:30
गोदावरी नदीपात्रात ७ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी १२ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. वास्तविक पाहता ५ व ६ सप्टेंबरपासून ...

पूर, पीकविम्याच्या प्रश्नावर भाकप करणार आंदोलन
गोदावरी नदीपात्रात ७ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी १२ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. वास्तविक पाहता ५ व ६ सप्टेंबरपासून २०० ते ३०० क्युसेक वेगाने प्रवाह नियंत्रित करता आला असता. नदीवरील बंधाऱ्यात १५ सप्टेंबरनंतर १०० टक्के पाणीसाठा करण्याची तरतूद असताना जिल्ह्यातील ढालेगाव, तारुगव्हाण, मुदगल या बंधाऱ्यात ऑगस्ट महिन्यातच १०० टक्के पाणीसाठा करण्यात आला. निम्न दुधना प्रकल्पातूनही पाणीसाठा किती करायचा आणि विसर्ग किती करायचा याचे कोणतेही धोरण अवलंबिण्यात आले नाही. त्यामुळे अतिवृष्टीनंतर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन अनेक गावांना फटका बसला. तेव्हा या प्रकरणी गोदावरी सिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, पूरग्रस्त नागरिकांना एनडीआरएफच्या तरतुदीनुसार हेक्टरी ३८ हजार रुपये अनुदान अदा करावे, अतिवृष्टी बाधित आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना १०० टक्के पीक नुकसान भरपाई जोखीम रकमेच्या प्रमाणात अदा करावी, ७२ तासांत तक्रार करण्याची पीक विमा योजनेतील चुकीची तरतूद तत्काळ रद्द करावी आदी मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने १५ सप्टेंबर रोजी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती काॅ. राजन क्षीरसागर, शेतकरी संघर्ष समितीचे माणिक कदम, शिवाजी कदम यांनी दिली.