संचारबंदीत पाच दिवसांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:18 IST2021-04-01T04:18:21+5:302021-04-01T04:18:21+5:30
दुकाने बंदच : जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय परभणी : विविध पक्ष संघटना, सेवाभावी संस्था आणि व्यापाऱ्यांतून संचारबंदीला होत असलेला विरोध झुगारून ...

संचारबंदीत पाच दिवसांची वाढ
दुकाने बंदच : जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
परभणी : विविध पक्ष संघटना, सेवाभावी संस्था आणि व्यापाऱ्यांतून संचारबंदीला होत असलेला विरोध झुगारून जिल्हा प्रशासनाने संचारबंदीत आणखी पाच दिवसांची वाढ केली असून, आता ५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील बाजारपेठा बंद राहणार आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी संचारबंदी हा पर्याय नाही, असे मत व्यक्त करीत अनेकांनी संचारबंदीला विरोध केला आहे. २४ मार्च रोजी संचारबंदी लागू केल्यानंतर, याविरुद्ध सेलू, परभणी येथे व्यापाऱ्यांनी प्रशासनाशी संपर्क करून दुकाने सुरू ठेवण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावेळी ही मागणी मान्य न करत, संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे मागच्या सात दिवसांपासून जिल्ह्यातील बाजारपेठा बंद आहेत. १ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता ही संचारबंदी संपणार असल्याने प्रशासन आता पुढे काय निर्णय घेते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यातच बुधवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी एक आदेश काढून जिल्ह्याच्या संचारबंदीत ५ एप्रिलपर्यंतची वाढ केली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, संचारबंदी कालावधीत वाढ करणे आवश्यक आहे, असे नमूद करीत संपूर्ण जिल्ह्याच्या हद्दीत ५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे. या काळात ज्या अस्थापना, अत्यावश्यक बाबींना सूट दिली आहे, त्यांना सूट राहील. त्याचप्रमाणे, ज्या अस्थापना, दुकानांना सूट नाही, त्या अस्थापना आणि दुकाने बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत.
काटेकोर अंमलबजावणीची गरज
मागील संचारबंदीच्या काळात संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही. बाजारपेठेतील दुकाने बंद आणि शहरात नागरिकांचा मुक्त संचार, असे चित्र दिसून येत होते. त्यामुळे ही संचारबंदी म्हणजे दुकानबंदी असल्याचेच चित्र सातही दिवस दिसून आले. त्यामुळे कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.