रात्री बारानंतरही अग्निशमन कार्यालय अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST2021-09-13T04:17:30+5:302021-09-13T04:17:30+5:30
अग्निशमन विभाग कार्यालय : पहाटे ४ वाजता परभणी : २४ तास अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या अग्निशमन विभागाच्या कार्यालयास पहाटे ...

रात्री बारानंतरही अग्निशमन कार्यालय अलर्ट
अग्निशमन विभाग कार्यालय : पहाटे ४ वाजता
परभणी : २४ तास अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या अग्निशमन विभागाच्या कार्यालयास पहाटे ४ वाजता फोनद्वारे संपर्क केला असता येथील सर्व यंत्रणा सुस्थितीत व सज्ज असल्याचे दिसून आले. कोणत्याही क्षणी घटना घडल्याचा कॉल येताच सर्व कर्मचारी त्यांच्या गणवेश व तयार बंबासह सज्ज असल्याचे आढळून आले.
परभणी शहराचा विस्तार वाढला आहे. यातच स्पार्किंग तसेच किरकोळ आगीच्या घटना व मोठ्या आगीच्या घटना अधूनमधून घडत असतात. यातच एखादी आगीची घटना घडल्यास अग्निशमन विभाग २४ तास सज्ज आहे की नाही याची पाहणी रविवारी पहाटे ४ वाजता फोन लावून केली असता यंत्रणा सज्ज असल्याचे आढळून आले.
तयार स्थितीत दोन बंब
परभणी शहरातील मोंढा परिसरात सेंट्रल नाक्याच्या बाजूला अग्निशमन विभागाचे फायर स्टेशन आहे. या ठिकाणी दोन बंब मोठ्या वाहनांचे तर एक छोटे वाहन उपलब्ध आहे. यातील दोन्ही मोठे बंब अत्यावश्यक कॉल आल्यास कायमस्वरूपी तयार ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक वाहनामध्ये ५ ते ६ हजार लिटर पाण्याचा साठा केलेला आहे.
रात्रीच्या वेळी ५ कर्मचारी कार्यरत
अग्निशमन विभागातील फायर स्टेशन येथे आलेला आपत्कालीन कॉल उचलण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त असतो. यासह रात्रीच्या वेळी दोन्ही वाहनावरील चालक, २ फायरमन व १ मदतनीस अशा पाच जणांची टीम तयार असल्याचे दिसून आले. यासह अग्निशमन अधिकारीसुध्दा नेहमीच अलर्ट असतात. याशिवाय दिवसभरात ५ कर्मचारी कार्यरत असतात.
नियम काय सांगतो ?
शहरात एखादी आगीची घटना घडल्यास संबंधित ठिकाणावरून आलेला फोन घेतल्यानंतर यंत्रणा अवघ्या १० ते १५ मिनिटानंतर अंतर पाहून जवळच्या मार्गाने तेथे पोहोचते. यानंतर आग विझविण्याची व संबंधितांना बाहेर सुखरूप काढण्याची मदत या विभागाकडून केली जाते. अत्यावश्यक सेवेतील यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत दिलेल्या आदेशाचे येथे पालन होते. यापूर्वी शहरात मागील दोन-तीन महिन्यांत पारवा रोड तसेच रेल्वे स्टेशन व अन्य काही ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनेत ही यंत्रणा सज्ज असल्याचे वेळोवेळी दिसून आले.
अग्निशमन विभागप्रमुखाचा कोट
परभणी शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता अजून २ फायर स्टेशन व ४ वाहने तसेच ५० ते ६० कर्मचारी उपलब्ध असणे गरजेचे आहे. सध्या १२ ते १५ कर्मचारी व तीन बंब सुसज्ज स्थितीत कार्यरत आहेत.
-दीपक कानोडे, अग्निशमन विभाग अधिकारी