कोरोनाचे नियम डावलणाऱ्यांकडून दोन लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:17 IST2021-05-19T04:17:32+5:302021-05-19T04:17:32+5:30
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी काळात विनाकारण घराबाहेर पडू नये, असे निर्देश देण्यात आले ...

कोरोनाचे नियम डावलणाऱ्यांकडून दोन लाखांचा दंड वसूल
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी काळात विनाकारण घराबाहेर पडू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे, आवश्यक असतानाच घराबाहेर पडणे बंधनकारक केले आहे. मात्र नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
१७ मे रोजी पोलीस प्रशासनाने याविरुद्ध मोहीम राबवत कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, जिल्हाभरात ही मोहीम राबविण्यात आली. त्यात मास्कचा वापर न करणाऱ्या ६३० नागरिकांकडून १ लाख २० हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे कलम १८८चे उल्लंघन करणाऱ्या ८५ व्यावसायिकांकडून ७२ हजार ३०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. कोरोना संसर्ग काळातही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात २४६ वाहनचालकांवर पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. यात २ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तीनही कारवायांमध्ये मिळून २ लाख ५ हजार रुपयांचा दंड पोलीस प्रशासनाला वसूल केला.
दोन हजार नागरिकांच्या आरटीपीसीआर तपासण्या
जिल्ह्यात विनाकारण घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या आरटीपीसीआर तपासण्या करण्याची मोहीमही आरोग्य विभागाच्या मदतीने पोलिसांनी राबविली. दिवसभरात २ हजार २७८ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२५, नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४२३, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३००, ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४६, सेलू २५, मानवत २८६, जिंतूर २२२, गंगाखेड २७३, कोण २०५, पूर्णा १५२, पालम ४९ आणि चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ जणांच्या आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या आहेत.