नियम मोडणाऱ्यांकडून वसूल केला सव्वा लाखाचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST2021-06-01T04:14:00+5:302021-06-01T04:14:00+5:30
परभणी : कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी पोलिसांनी मात्र कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी सुरूच ठेवली असून, रविवारी ...

नियम मोडणाऱ्यांकडून वसूल केला सव्वा लाखाचा दंड
परभणी : कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी पोलिसांनी मात्र कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी सुरूच ठेवली असून, रविवारी नियम डावलणाऱ्यांकडून एक लाख ३३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सध्या कमी झाला आहे. त्यामुळे नागरिक बिनधास्तपणे घराबाहेर पडत आहेत. जिल्हा प्रशासनाची संचारबंदी कायम असतानाही विनाकारण घराबाहेर पडलेल्या या नागरिकांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मागील आठवडाभरापासून पोलीस प्रशासनाने ही मोहीम सुरू केली असून, दररोज दंड वसूल केला जात आहे.
परभणी जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान ३०८ नागरिक विनामास्क घराबाहेर पडल्याचे निदर्शनास आले. या नागरिकांकडून ६३ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे परवानगी नसतानाही दुकान सुरू ठेवलेल्या २६ व्यावसायिकांकडून ४९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौघांकडून ८०० रुपये तर मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ६४ दुचाकी व चारचाकी वाहनधारकांकडून १९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दिवसभरात १ लाख ३३ हजार २०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला.
परभणी शहरातही प्रमुख मार्गांवर पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनधारकांची तपासणी केली. पोलिसांच्या या मोहिमेमुळे अनेक नागरिकांनी कारवाई टाळण्यासाठी गल्लीबोळातील रस्त्यांचा वापर करत वाहतूक केल्याचे दिसून आले.
१५ दुचाकी वाहने जप्त
विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्यातूनच रविवारी दिवसभरात १५ वाहने जप्त करण्यात आली. नानालपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २, सेलू १, मानवत ७ आणि गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ वाहने जप्त करण्यात आली.