कोरोना झालेल्या ५४ टक्के रुग्णांनी घेतली नव्हती लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:17 IST2021-09-13T04:17:37+5:302021-09-13T04:17:37+5:30
परभणी : ऑगस्ट महिन्यात नोंद झालेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ५४ टक्के रुग्णांनी लस घेतली नसल्याची बाब समोर आली आहे. ...

कोरोना झालेल्या ५४ टक्के रुग्णांनी घेतली नव्हती लस
परभणी : ऑगस्ट महिन्यात नोंद झालेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ५४ टक्के रुग्णांनी लस घेतली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे लसीकरण न करणे या रुग्णांसाठी महागात पडल्याचेच दिसत आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण आणि मास्कचा वापर हे दोनच पर्याय असल्याचे आरोग्य विभागाकडून वारंवार सांगितले जात आहे. जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्नही केले जात आहेत. मात्र नागरिकांकडून लस घेण्यासाठी अनेक वेळा टंगळमंगळ केली जात आहे. त्यामुळे केव्हा कोरोनाचा संसर्ग होईल, हे सांगता येत नाही. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप कोरोना रुग्णसंख्येने शून्य गाठलेला नाही. त्यामुळे नागरिकांनीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यातच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करून नागरिकांनी देखील मास्कचा वापर करणे, लसीकरण करून घेणे या बाबी प्राधान्याने करणे गरजेचे आहे.
लस घेतल्यानंतर किती जणांना कोरोना झाला. याची पडताळणी केली असता, ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कोरोनाच्या एकूण ५९ रुग्णांची नोंद झाली. या ५९ रुग्णांपैकी किती जणांनी लसीकरण करुन घेतले आहे, याची माहिती घेतली तेव्हा, ३२ रुग्ण असे आहेत, ज्यांनी कोरोनाची लस घेतली नसल्याची बाब पुढे आली. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांपैकी ५४ टक्के रुग्णांनी लस घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णांनी लस घेतली असती तर कदाचित त्यांचे कोरोनापासून संरक्षण झाले असते. त्यामुळे कोरोनापासून सुरक्षित राहायचे असेल तर लसीकरण करणे आवश्यक झाले आहे.
३२ टक्के रुग्णांनी घेतला होता पहिला डोस
ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधित झालेल्या एकूण रुग्णांपैकी ३२ टक्के रुग्णांनी लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यांना कोरोना झाला असला तरी त्याची तीव्रता अधिक नव्हती. ऑगस्ट महिन्यात नोंद झालेल्या ५९ रुग्णांपैकी १९ रुग्णांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. असे असताना त्यांना कोरोना संसर्ग झाला. मात्र त्याची तीव्रता अधिक नव्हती. कोरोनाचा संसर्ग झाला असला तरी या रुग्णांना कोरोनातून बरे होण्यासाठी फारशा अडचणी झाल्या नाहीत.
लस घेऊनही १३ टक्के बाधित
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्याचे प्रमाण १३ टक्के एवढे अत्यल्प आहे. अनेक जण लसीकरण केल्यानंतर प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत नाहीत. लस घेणे जेवढे महत्त्वाचे आहे. तेवढेच महत्त्वाचे लसीकरण करून घेणे आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतर देखील मास्कचा वापर, फिजिकल डिस्टंन्सचे पालन या नियमांचे पालन केल्यास कोरोनापासून दूर राहणे शक्य आहे. ऑगस्ट महिन्यात केवळ ८ रुग्णांना दोन्ही लस घेतल्यानंतर कोरोना झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यातील रुग्ण
एकूण रुग्ण : ५९
लस न घेतलेले रुग्ण : ३२
पहिला डोस घेतलेले रुग्ण : १३
दोन्ही डोस घेतलेले रुग्ण : ०८