दुचाकी अपघातात गंभीर जखमी पिता-पुत्राचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 13:25 IST2021-06-24T13:24:35+5:302021-06-24T13:25:39+5:30
दुचाकी (एमएच २२ एयू १८७४) च्या चालकाने आपली दुचाकी भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवून या पिता-पुत्राला व त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

दुचाकी अपघातात गंभीर जखमी पिता-पुत्राचा मृत्यू
गंगाखेड (जि. परभणी) : परळी रस्त्यावर बनपिंपळा शिवारात सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पिता-पुत्राचा २२ जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी रस्त्याने गंगाखेड शहराकडे येत असलेले शेरखान इब्राहीम खान पठाण (३९) हे २१ जून रोजी बनपिंपळा शिवारात दुचाकीच्या चाकातील चिखल काढत असताना त्यांच्या बाजूला मुलगा आसिफ खान शेरखान पठाण (५, दोघे रा. गंगाखेड) थांबला होता. सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गंगाखेड रस्त्याने परळीकडे जाण्यासाठी विरुद्ध दिशेने दुचाकी भरधाव वेगात येत होती. दुचाकी (एमएच २२ एयू १८७४) च्या चालकाने आपली दुचाकी भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवून या पिता-पुत्राला व त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात शेरखान इब्राहीम खान पठाण व त्यांचा पाच वर्षीय मुलगा आसिफ खान पठाण गंभीर जखमी झाले. गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार करून लातूर येथे हलविले.
शेरखान पठाण यांची प्रकृती अति गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात दाखल केले असता २२ जून रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान सोलापूर येथे त्यांचा मुत्यू झाला. तसेच मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास लातूर येथील रुग्णालयात आसिफ खान पठाण या बालकाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या पिता-पुत्राच्या मृत्यूप्रकरणी इब्राहीम खान बावदीन खान पठाण (रा. गंगाखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २३ जून रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास स.पो.नि. बालाजी गायकवाड, पो.शि. हरीश बनसोडे करीत आहेत.