गंगाखेड - परळी मार्गावर बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, ९ प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 11:31 IST2025-12-16T11:31:34+5:302025-12-16T11:31:50+5:30
अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने पलटी झाली.

गंगाखेड - परळी मार्गावर बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, ९ प्रवासी जखमी
गंगाखेड (जि. परभणी) : गंगाखेड -परळी मार्गावरील पडेगाव पाटीजवळ महामंडळाच्या बस -ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. या अपघातात ट्रॅक्टरवरील एकाचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले.
नगपूर विभागातील गणेशपेठ आगारची बस क्र.(एम एच ०९ एफ एल ०१७९) नागपूर -आंबेजोगाई बस सोमवारी सायंकाळी गंगाखेडहून आंबेजोगाईकडे जात होती. यात चालक वाहकांसह आठ प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, पडेगाव पाटीजवळ येताच समोरून ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहने पलटी झाली. त्यात ट्रॅक्टरवरील परमेश्वर डावरे (६०, रा. गंगाखेड) यांचा जागीच मृत्यू झाला तर विश्वनाथ शिंदे, नवनाथ कांबळे, सुधाकर जाधव, तुळशीराम साळवे, उमेश गडदे, समीर पठाण जुबेर खान, निखिल गायकवाड, बसचालक संतोष वायबसे हे प्रवासी किरकोळ जखमी झाले.
जखमींवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील, पोनि. श्रीकांत डोंगरे यांच्या पथकाने धाव घेत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद घेण्यात आली नव्हती.