परभणी येथे ग्रामस्थांचे रस्त्यासाठी गुराढोरांसह उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 15:35 IST2018-07-16T15:34:04+5:302018-07-16T15:35:21+5:30
शेतरस्ता खुला करुन द्यावा, या मागणीसाठी तालुक्यातील शिर्शी खु. येथील शेतकऱ्यांनी आजपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गुराढोरांसह उपोषण सुरु केले.

परभणी येथे ग्रामस्थांचे रस्त्यासाठी गुराढोरांसह उपोषण
परभणी : गावातील शेतरस्ता खुला करुन द्यावा, या मागणीसाठी तालुक्यातील शिर्शी खु. येथील शेतकऱ्यांनी आजपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गुराढोरांसह उपोषण सुरु केले.
शिर्शी खु. ते सहजपूर जवळा असा गाडी रस्ता असून काही वर्षापासून हा रस्ता बंद करण्यात आल्याने आंदोलनाचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. येथील शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना या संदर्भात निवेदन दिले आहे. हा रस्ता पिढ्यान्पिढ्या वहिवाटीचा रस्ता होता. मात्र गट क्रमांक १०८, १२१ व १२२ मधील शेतकऱ्यांनी दीड वर्षापासून रस्ता अडविला आहे. या संदर्भात तहसील कार्यालय तसेच पोलीस अधीक्षकांकडेही तक्रारी केल्या. मात्र दखल घेतली नसल्याने आजपासून ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला.
शहरात सकाळपासून पाऊस सुरु असतानाही हे शेतकरी गुराढोरांसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात दाखल झाले. भर पावसात शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आंदोलनात मारोती कोडेवाड, रामदास कनके, मधुकर कनके, शंकर कोडेवाड, कैलास कोडेवाड, केशव कनके, संजय कनके, बाजीराव कनके, मंचक कनके, गणेश कनके आदींचा सहभाग आहे.