शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले; पावसामुळे खोळंबल्या रबीच्या पेरण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 17:42 IST2019-11-16T17:38:41+5:302019-11-16T17:42:14+5:30
परभणीत मोठे क्षेत्र राहिले पेरणीविना

शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले; पावसामुळे खोळंबल्या रबीच्या पेरण्या
- मारुती जुंबडे
परभणी : येथील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने २०१९-२० या रबी हंगामासाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले होते; परंतु, परतीच्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने जिल्ह्यात १४ नोव्हेंबरपर्यंत ३.५ टक्के पेरण्या झाल्या आहेत.
गतवर्षी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने रबी हंगामातील २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडीत राहिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रबी हंगामात कोणतेच पीक घेता आले नाही. परिणामी, सर्व शेतकऱ्यांच्या नजरा यावर्षीच्या रबी हंगामाकडे लागल्या आहेत. जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या मध्यानंतर परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे आजही शेतामध्ये ओल असल्याने रबी हंगामातील पेरणी शेतकऱ्यांना करता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या सध्या तरी रखडल्या आहेत.
जिल्ह्यात ५.१० टक्के हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली असून गहू, हरभरा, करडई, सूर्यफूल आदी पिकांची मात्र अद्यापही शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही. येत्या आठ दिवसांत पाऊस झाला नाही तर रबी हंगामातील क्षेत्र वाढेल.
परतीच्या पावसाचा सिंचनाला फायदा
यावर्षी परतीच्या पावसाचे जिल्ह्यात जोरदार आगमन झाल्याने शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या जलस्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. परिणामी, या पाणीसाठ्याचा रबी हंगामातील पिकांना सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे सहाजिकच यावर्षीच्या रबी हंगामात हरभरा व गव्हाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.