-विठ्ठल भिसेपाथरी :तालुक्यात 25 आणि 26 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली असताना कासापुरी सर्कलमध्ये पडलेला पाऊस प्रजन्य मापकात कमी दाखवण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान आणि पीकविमा या दोन्ही लाभांपासून वंचित राहावे लागत आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ 20 ऑक्टोबर रोजी कासापुरी सर्कलमधील शेतकऱ्यांनी ढालेगाव बंधाऱ्यात जलसमाधी आंदोलन केले.
या आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. पाऊस पडला तरी आकडेवारीत नाही, मग आम्हाला मदत कधी मिळणार? या घोषणांनी गोदावरी नदीचे पात्र दणाणून गेले. शेतकऱ्यांनी स्कायमेट कंपनीवर तीव्र रोष व्यक्त करत कंपनीवर गुन्हा नोंदवा नाहीतर आमच्यावर करा, अशी ठाम भूमिका घेतली.
आंदोलनाची माहिती मिळताच तहसीलदार एस एन हंदेश्वर, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, आणि तालुका कृषी अधिकारी कोल्हे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी दीर्घ चर्चा केली. तब्बल दोन तास चाललेल्या चर्चेनंतर प्रशासनाने लेखी स्वरूपात आश्वासन दिले की —स्कायमेट कंपनीकडून पावसाच्या नोंदींबाबत खुलासा मागवून, वास्तविक पावसाची माहिती शासनाकडे सादर केली जाईल. शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी योग्य प्रस्ताव पाठवला जाईल.हे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
कासापुरी सर्कलमध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील कापूस, सोयाबीन, आणि तूर पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र स्कायमेटच्या नोंदीत पावसाचे प्रमाण कमी दाखवण्यात आल्याने शासनाच्या निकषांनुसार हा भाग अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित झालाच नाही. परिणामी शेतकरी मदतीपासून वंचित राहिले.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पावसाची नोंद करण्याच्या यंत्रणेतील त्रुटीमुळे दरवर्षी अनेक गावे अन्याय सहन करतात. शेतात पिके वाहून जातात, पण यंत्रणेच्या आकड्यांमध्ये पाऊस पडतच नाही, मग मदत कोण देणार? असा सवाल शेतकरी करत आहेत.या घटनेनंतर प्रशासन आणि स्कायमेट कंपनीच्या नोंदीतील अचूकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांची प्रमुख मागणी :• स्कायमेट कंपनीवर गुन्हा दाखल करावा• पावसाच्या नोंदींची चौकशी करावी• अतिवृष्टीग्रस्त म्हणून कासापुरी सर्कलचा पुनर्विचार करावा
Web Summary : Farmers in Kasapuri protested against Skymet's inaccurate rainfall data, leading to denial of aid. They demanded action against the company after crop losses. Officials promised investigation and revised assessment.
Web Summary : कासापुरी के किसान स्कायमेट के गलत बारिश के आंकड़ों से नाराज हैं, जिससे सहायता से वंचित रहे। फसल नुकसान के बाद उन्होंने कंपनी के खिलाफ कार्रवाई की मांग की। अधिकारियों ने जांच और संशोधित मूल्यांकन का वादा किया।