जिंतूर येथे कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 17:42 IST2018-08-13T17:42:04+5:302018-08-13T17:42:49+5:30
सततची नापिकी, दुष्काळ व कर्जमाफीचा गोंधळामुळे तालुक्यातील दहेगाव येथे एका ३० वर्षीय शेतकऱ्याने रविवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन केले.

जिंतूर येथे कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
जिंतूर (परभणी ) : सततची नापिकी, दुष्काळ व कर्जमाफीचा गोंधळामुळे तालुक्यातील दहेगाव येथे एका ३० वर्षीय शेतकऱ्याने रविवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन केले. अशोक एकनाथ ढोणे असे शेतकऱ्याचे नाव असून आज उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील दहेगाव ( ढोणे ) येथे राहणारे अशोक एकनाथ ढोणे हे आपल्या वडिलोपार्जित शेतीवर मेहनत करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह भागवत असत. या वर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने उधारी उसनवारी तसेच खाजगी कर्ज घेऊन शेतात पेरणी केली होती मात्र मागील २० दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे ऐन जोमात असलेली पिके सुकत असल्याने हाता तोंडाशी घास हिरावला जातो की काय याच विवंचनेत ढोणे असत.
यातच त्यांच्या आई व वडिलांच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेतीवर घेतलेले कर्ज होते हे कर्जमाफ होईल व नवीन कर्ज मिळेल या आशेवर असतांना अजूनही कर्ज माफी झाली नाही.यामुळेही ते निराश होते. यामुळे आपल्या कुटुंचा उदरनिर्वाह कसा चालवावा याच विवनचतेत त्यांनी रविवारी रात्री रात्री १ वाजेच्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले.
ही बाब नातेवाईकांच्या लक्षात येताच ढोणे यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथून त्यांना पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. येथेच उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गावातील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व तीन भाऊ असा परिवार आहे.