पोळ्याच्या पूर्वसंध्येला सर्पदंश झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By राजन मगरुळकर | Updated: August 26, 2022 17:30 IST2022-08-26T17:29:39+5:302022-08-26T17:30:15+5:30
कौसडी येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागील दर्गा रस्त्यावर शेतकरी मृत अवस्थेत आढळून आला.

पोळ्याच्या पूर्वसंध्येला सर्पदंश झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
बोरी (जि.परभणी) : जिंतूर तालुक्यातील कौसडीच्या हनुमान मंदिरामागील दर्गा रस्त्यावर एकाचा मृत्यू झाला. ही घटना २५ ऑगस्ट रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याबाबतची माहिती गावातील शेतकऱ्याने बोरी पोलीसांना दिली. त्यावरुन पाहणी केली असता संबंधिताचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचे तपासणीत आढळले.
कौसडी येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागील दर्गा रस्त्यावर एक व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आला. याची माहिती गावातील एका शेतकऱ्याने बोरी पोलीस ठाण्यात दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत मुळे, कर्मचारी सय्यद रफीक, बद्रीनाथ कंठाळे, तूपसुंदरे यांच्यासह घटनास्थळी धाव घेत मृत व्यक्तीची ओळख पटवली. मृत व्यक्ती हा कौसडीतील बसवेश्वर नगरमधील हरिभाऊ अंभोरे असल्याचे समजले. हरिभाऊ अंभोरे यांच्या घरातील व्यक्तींना बोलावून मृतदेह शवविच्छेदनासाठी बोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आला. डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी केल्यानंतर मृत व्यक्तीच्या पायाला सर्पदंश झाल्याचे सांगितले. शुक्रवारी बोरी पोलिस ठाण्यात आकस्मिक गुन्ह्याची नोंद झाली आहे. मयत हरिभाऊ अंभोरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, भाऊ, भावजय असा परिवार आहे.