साडेतीन हजार शेतकऱ्यांना अग्रिम देण्याकडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST2021-02-06T04:30:10+5:302021-02-06T04:30:10+5:30

गंगाखेड : अतिवृष्टीने बाधित झालेल्या तुरीचा पंचनामा करून अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ३ ...

Eyes on giving advance to three and a half thousand farmers | साडेतीन हजार शेतकऱ्यांना अग्रिम देण्याकडे कानाडोळा

साडेतीन हजार शेतकऱ्यांना अग्रिम देण्याकडे कानाडोळा

गंगाखेड : अतिवृष्टीने बाधित झालेल्या तुरीचा पंचनामा करून अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ३ हजार ६९९ शेतकऱ्यांची ३ हजार ५६ हेक्टरवर तूर बाधित झाल्याचा अहवाल विमा कंपनीकडे पाठवला. त्यापैकी ९४८ हेक्टरवरील तूर पिकाचा विमा शेतकऱ्यांनी काढला होता. त्यामुळे या शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम कंपनीने देणे बंधनकारक होती. मात्र, त्याकडे कानाडोळा करण्यात आला.

गंगाखेड तालुक्यात ऑक्टोबर २०२० मध्ये अतिवृष्टी होऊन तूर पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दखल घेत जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी तूर पिकाच्या बाधित क्षेत्राचा पंचनामा करून अहवाल पाठविण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार तूर पिकाची पाहणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व महसूलच्या अधिकाऱ्यांनी गावनिहाय पथक स्थापन केले होते. या पथकात मंडळ अधिकारी, कृषी सहायक अधिकारी, तलाठी व विमा कंपनीचा अधिकारी, तसेच गावचा शेतकरी किंवा लोकप्रतिनिधी आदींची नियुक्ती केली होती. या पथकाने आपापल्या भागातील नुकसानग्रस्त तुरीचा पंचनामा केला. यामध्ये गंगाखेड मंडळ क्षेेत्रात ४१३ हेक्टरवरील तूर बाधित झाल्याचा अहवाल दिला. त्याचबरोबर राणीसावरगाव मंडळात ४६३ हेक्टर, महातपुरी मंडळात १,०४४ हेक्टर, माखणी मंडळात ६६२, तर पिंपळदरी महसूल मंडळात ४७५ हेक्टरवरील तूर पिकास फटका बसल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला. जिल्हा प्रशासनाने गंगाखेड तालुक्यात ४ हजार ६२६ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला असून, त्यापैकी अतिवृष्टीने ३ हजार ५६ हेक्टरवरील तूर पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे ३ हजार ६९९ शेतकऱ्यांनी ९४८ हेक्टरवरील तूर पिकाचा विमा उतरविला आहे. त्यामुळे हे शेतकरी तूर पिकाच्या अग्रिम रकमेसाठी पात्र आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना २५ दिवसांच्या आत अग्रिम रक्कम देणे बंधनकारक होते. मात्र, त्याकडे या विमा कंपनीने कानाडोळा केला आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप

रिलायन्स जनरल इन्शुरन्स व इतर कंपन्यांकडून नुकसान झालेल्या पिकांचा मोबदला मागील काही वर्षांपासून देताना आखडता हात घेतला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पिके विमा कंपनीकडे संरक्षित करूनही मोबदला देण्यासाठी कंपन्यांकडून कानाडोळा केला जात आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधीही उदासीन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Eyes on giving advance to three and a half thousand farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.