परभणी शहरातील घटना : कारची काच फोडून दीड लाख केले लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:32 IST2018-09-29T00:32:12+5:302018-09-29T00:32:58+5:30
शहरातील दर्गा रोडवरील गालिब नगरात निवृत्त पोलीस उपअधीक्षकांच्या कारची काच फोडून १ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली.

परभणी शहरातील घटना : कारची काच फोडून दीड लाख केले लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील दर्गा रोडवरील गालिब नगरात निवृत्त पोलीस उपअधीक्षकांच्या कारची काच फोडून १ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौला सय्यद साब चौधरी (वय ६८, रा. खंडोबा गल्ली, नांदेड) या निवृत्ती पोलीस उपअधीक्षकांनी शहरातील दर्गारोडवरील गालिब नगरात गुरुवारी दुपारच्या सुमारास गाडी क्रमांक एम.एच. २६ ए.के. ५६०५ ही कार उभी केली. त्यानंतर ते तेथून निघून गेले;परंतु, तेवढ्याच वेळात गाडीच्या कप्प्यात ठेवलेले रोख १ लाख ४५ हजार रुपये, तीन पासबूक, एक चेकबुक व इतर कागदपत्रे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.
ही बाब मौला सय्यद साब चौधरी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला;परंतु, तेथे कोणीच त्यांना दिसून आले नाही. त्यामुळे त्यांनी गालिब नगरातून थेट कोतवाली पोलीस ठाणे गाठले. तेथे त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युनूस पठाण हे करीत आहेत.
भर दिवसा दर्गा रोड परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे निवृत्त पोलीस उपअधीक्षकांच्या गाडीत चोरी झाल्याने नागरिकांमध्ये शुक्रवारी दिवसभर चर्चा सुरू होती.