इमारत बांधकाम नावाखाली कर्मचाऱ्यांची शिक्षण संस्थेकडून ४७ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 13:57 IST2024-12-14T13:57:20+5:302024-12-14T13:57:39+5:30
जिंतूरच्या विश्वकर्मा निवासी अस्थिव्यंग शाळेतील प्रकार; पती-पत्नीविरुद्ध गुन्हा

इमारत बांधकाम नावाखाली कर्मचाऱ्यांची शिक्षण संस्थेकडून ४७ लाखांची फसवणूक
जिंतूर : संस्थेच्या इमारत बांधकामासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून ४६ लाख ७० हजार रुपये घेऊन इमारत न बांधता फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध जिंतूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दीप शिक्षणसंस्था नांदेडचे अध्यक्ष नारायण देवराव पवार यांनी फिर्याद दिली. आरोपी उत्तम गंगाधर कुंटूरकर व कल्पना नामदेव कोटूरवार या दोघांनी जुन्या स्टॅम्पचा वापर करून कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देऊन काही कर्मचाऱ्यांकडून मोठ्या रकमा उकळल्या. या रकमा सन २०१७ ते २०२१ या पर्यंतच्या थकीत वेतनाच्या असून, थकीत वेतन आल्याचे समजल्यानंतर कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन इमारत बांधकामाच्या नावाखाली या रकमा उकळण्यात आल्या. या संदर्भामध्ये संबंधित संस्थेचे सध्याचे अध्यक्ष नारायण पवार यांनी फिर्याद दिली.
विशेष म्हणजे उत्तम कुंटूरकर हे संस्थेचे केवळ सदस्य असून, त्यांच्या पत्नी कल्पना पवार या सन १९९८ मध्ये संस्थेच्या उपाध्यक्ष होत्या. त्यानंतर सन २०११ मध्ये ही सर्व कार्यकारिणी बदलण्यात आली होती. परंतु, जुन्या असणाऱ्या पदांचा लेटर पॅड व शिक्के वापरून कर्मचाऱ्यांना या नियुक्त्या दिल्या होत्या. विशेष म्हणजे, मागील अनेक दिवसांपासून ही संस्था वादाच्या भोवऱ्यात आहे. संस्थेमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात किंवा नाही हेही संशयास्पद प्रकार आहे.
अशा उकळल्या रकमा
राधा भगवान जाधव (कलाशिक्षिका) यांच्याकडून १२ लाख ६० हजार रुपये, शेख सादिक शेख गुलाम (विषय शिक्षक) यांच्याकडून ११ लाख ६० हजार रुपये, पठाण मुजाहिद खान जाफरखान (लिपिक) ६० हजार रुपये, शबाना बाबर पठाण (स्वयंपाकीण) ५ लाख ५० हजार, शेख रफिक शेख रजका (मोलकरीण) ६ लाख रुपये, सय्यद अरेफोदिन नसिरुद्दीन (शिपाई) ४ लाख ९० हजार, सांडू दगडू मगरे ५ लाख ५० हजार असे एकूण ४६ लाख ७० हजार रुपये उकळले.