आयशर ट्रक-ऑटोचा अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी, परभणी-पिंगळी मार्गावर शेंद्रा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 23:34 IST2025-07-23T23:33:27+5:302025-07-23T23:34:29+5:30
Parbhani News: परभणी-ताडकळस महामार्गावर बलसा परिसरात शेंद्रा पाटीजवळ बुधवारी रात्री पावणेआठच्या सुमारास ट्रक आणि ऑटोचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये दोघेजण मयत तर तिघेजण जखमी झाले आहेत.

आयशर ट्रक-ऑटोचा अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी, परभणी-पिंगळी मार्गावर शेंद्रा येथील घटना
- राजन मंगरूळकर
परभणी - परभणी-ताडकळस महामार्गावर बलसा परिसरात शेंद्रा पाटीजवळ बुधवारी रात्री पावणेआठच्या सुमारास ट्रक आणि ऑटोचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये दोघेजण मयत तर तिघेजण जखमी झाले आहेत. यातील एका मयताची ओळख पटली असून संबंधित मयत तरुण हा कळमनुरी तालुक्यातील बोथी येथील रहिवासी असून तो परभणी येथून पिंगळीला बहिणीकडे भेटण्यासाठी अपघातग्रस्त झालेल्या ऑटोने जात होता.
परभणी-पिंगळी रस्त्यावर शेंद्रा पाटीजवळ परभणी येथून पिंगळीकडे जाणारा ऑटो क्रमांक (एमएच २२ एपी ४१९५) आणि ताडकळस येथून परभणीकडे येणाऱ्या ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये ट्रक आणि ऑटोची समोरासमोर धडक झाल्याने ऑटो रस्त्याच्या बाजूला जाऊन चेंदामेंदा झाला. यात ऑटोमधील दोघेजण मयत तर तिघे जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घडला. यानंतर घटनास्थळी शेंद्रा, बलसा आणि पिंगळी परिसरातील ग्रामस्थ, वाहनधारक मदतीसाठी दाखल झाले होते. घटनास्थळी परभणी शहरचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे, नवा मोंढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि कर्मचारी मदत कार्य करण्यासाठी आले होते. यामध्ये करण माहोरे (२१, रा.बोथी, ता.कळमनुरी) याचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. करण माहोरे हा परभणीच्या इंदिरा गांधी कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होता. पिंगळी येथे बहिणीला भेटण्यासाठी ऑटोने जाताना झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. घटनेतील अन्य एका मयताची ओळख रात्री पावणेदहा वाजेपर्यंत पटली नव्हती. संबंधित दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते.
जखमींमध्ये दिनेश कांबळे (३५ रा.पिंगळी) आणि राजकुमार लोखंडे (४८,रा.पिंगळी) यांचा समावेश आहे. यातील दिनेश कांबळे हे ऑटोचालक आहेत. घटनास्थळावरून संबंधित जखमी आणि मृतदेह यांना परभणीत आणण्यासाठी १०८ रुग्णवाहिका तसेच अन्य वाहन चालकांनी मदत केली. तर अन्य एक जण जखमी परभणीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. संबंधिताचे नाव जैस्वाल असल्याचे समजले. जखमींना १०८ चे रुग्णवाहिकेचे डॉ.कुलदीप चोरमले, चालक दीपक लांडगे, डॉ.सतीश गायकवाड आणि राजू साळवे, धोंडीराम साबळे यांनी रुग्णालयात दाखल केले. अपघात नेमका कसा झाला, हे मात्र समजू शकले नाही.