खाद्यतेलाने महागाईत ‘तेल’ ओतले; ७० रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST2021-04-02T04:17:24+5:302021-04-02T04:17:24+5:30
दररोजच्या आहारात आवश्यक असणाऱ्या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आतापर्यंत पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनाच्या दरात सातत्याने वाढ ...

खाद्यतेलाने महागाईत ‘तेल’ ओतले; ७० रुपयांची वाढ
दररोजच्या आहारात आवश्यक असणाऱ्या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आतापर्यंत पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने महागाई वाढत असतानाच आता त्यात खाद्य तेलानेही उडी घेतली आहे. मागच्या वर्षभरात खाद्यतेल सरासरी ६० रुपयांनी वाढले आहे. जागतिक स्तरावर तेलाची टंचाई निर्माण झाल्याने भाववाढ होत असल्याचे सांगितले जाते.
त्याचप्रमाणे तेलबियांचे कमी असलेले उत्पादन हेही त्यासाठी एक कारण आहे. काहीही असले तरी बाजारपेठेत तेलाचे भाव कमालीचे वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. दररोजच्या जेवणात तेलाचा वापर होतो. मात्र भाववाढीमुळे हे तेलच गायब करण्याची वेळ आता आली आहे.
सतत या न त्या कारणाने महागाई वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात सोयाबीन आणि सूर्यफूल या दोन तेलांचा सर्वाधिक वापर होतो. मागील वर्षी मार्च महिन्यात सूर्यफूल तेल १०६ रुपये किलो या दराने विक्री झाले होते. याच तेलाचे दर आता १६७ रुपयांवर पोहोचले आहेत. वर्षभरात तेलाच्या किमती ६० रुपयांनी वाढल्या आहेत, तर मागील वर्षी ९७ रुपये किलो या दराने विक्री होणाऱ्या सोयाबीन तेलाचे दर यावर्षी मात्र १४० रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे महागाईत तेलाने भर टाकली आहे.
तेलाचे दर सातत्याने वाढत असल्याने किराणावर महिन्यासाठी नियोजित केलेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च होत आहे. त्यामुळे घरातील महिन्याचे आर्थिक बजेट विस्कळीत होत आहे. तेलाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम अन्य खाद्यपदार्थांवरही होत असून, महागाई वाढत आहे.
-सुनीता दामोशन, गृहिणी
इंधनाच्या दरापाठोपाठ आता खाद्यतेलांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशा परिस्थितीत घरातील आर्थिक नियोजन लावताना तारांबळ उडते. तेलासह मागच्या काही महिन्यांपासून गॅसच्या किमतीही तेवढ्याच वाढल्या आहेत. शासनाने तेलांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
-आरती वाघ, प्रतिक्रिया
वर्षभरात तेलाच्या किमतीत थोडीफार वाढ झाली तरी काही तरी पर्यायी व्यवस्था केली जाऊ शकते. मात्र ६० रुपयांनी तेलाच्या किमती वाढल्याने महिनेवारी खर्चावर त्याचा परिणाम होत आहे. वाढत चाललेल्या महागाईच्या सर्वाधिक झळा मध्यमवर्गीय कुटुंबीयांना सहन कराव्या लागत आहेत.
-गृहिणी, प्रतिक्रिया
तेलबियांचे कमी झालेले उत्पादन आणि जागतिक स्तरावर तेलाची कमतरता असल्याने भाववाढ होत आहे. तेलाची आयात करावी लागू नये, यासाठीही देशात तेलाच्या किमती वाढवून तेलबियांचे उत्पादन वाढविण्याचा धोरण असू शकते.
-अशोक जैन, व्यापारी