मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 16:41 IST2018-04-19T16:34:47+5:302018-04-19T16:41:32+5:30
विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषण करीत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे यांच्यासह अन्य एका महिलेने शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून गोंधळ घातला.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीचा गोंधळ
परभणी : येथील विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषण करीत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे यांच्यासह अन्य एका महिलेने शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून गोंधळ घातला़
परभणीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत गुरुवारी विविध विकास कामांचे ई-भूमीपूजन झाले़ यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करीत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे या महिलांमधून उठून मुख्यमंत्र्यांच्या दिशेने धावत येत होत्या़ त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले़ त्यांच्या पाठीमागून स्वाभिमानीच्या विद्यार्थी परिषदेच्या उपाध्यक्षा शर्मिला येवले या मुख्यमंत्र्यांकडे धावल्या़ काही अंतरावरच त्यांनाही पोलिसांनी रोखले़ यावेळी या महिला कार्यकर्त्यांनी राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत़ यावर तुम्ही काहीच करीत नाही़ शेतकरी स्वत:हून सरण रचून आत्महत्या करीत आहेत, तुम्ही मात्र इकडे उद्घाटन करीत फिरत आहात, तुम्हाला काही तरी वाटायला पािहजे, शेतकऱ्यांना बोंडअळीचे अनुदान मिळालेले नाही, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्यल्प पीक विमा मिळाला, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, असे यावेळी या महिला पदाधिकारी त्वेषाने बोलत होत्या़
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून त्या महिला पदाधिकाऱ्यांना सभा संपल्यानंतर बोलावून घ्या, त्यांचे म्हणणे ऐकून घेतो, मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असला की अशा घटना घडत असतात, याची मला जाणीव आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले़ त्यानंतर पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेतले़ त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू झाले़ मुख्यमंत्र्यांच्या भाषणा दरम्यानही काही जण सरकार विरोधी घोषणा देत होते.