Drought In Marathwada : टँकरच्या मागणीसाठी महिला आणि ग्रामस्थांनी ग्रामसेवकास ठेवले ओलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 19:42 IST2019-04-02T19:39:17+5:302019-04-02T19:42:06+5:30
तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने अखेर ग्रामसेवकाची सुटका करण्यात आली.

Drought In Marathwada : टँकरच्या मागणीसाठी महिला आणि ग्रामस्थांनी ग्रामसेवकास ठेवले ओलीस
गंगाखेड (परभणी ) : तालुक्यातील खंडाळी गावात टँकर सुरु करण्याच्या मागणीसाठी महिला आणि ग्रामस्थांनी आज ग्रामसेवकास घेराव घालून समाजमंदिरात बसवून ठेवले. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने तीन तासानंतर ग्रामसेवकाची सुटका करण्यात आली.
खंडाळी गावात पाणीटंचाई असल्याने पाण्याचा टँकर सुरू करण्याबाबत जानेवारीमध्ये ग्राम पंचायतीत ठराव घेण्यात आला. त्यांनतर पंचायत समितीकडे हा प्रस्ताव सादर करून सुद्धा टँकर सुरू झाले नाही. किरकोळ त्रुटी दाखवून प्रस्ताव परत पाठविण्यात येत असल्याने महिला आणि ग्रामस्थ संतप्त झाले. यामुळे आज सकाळी गावात आलेले ग्रामसेवक एम.व्ही. नवटके यांना घेराव घालत जाब विचारला. तसेच याबाबत ठोस आश्वासन मिळेपर्यंत गावातील समाजमंदिरात बसवून ठेवले.
ही माहिती समजताच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रविण सुराडकर, तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी भ्रमणध्वनीवरून ग्रामस्थांशी संवाद साधला. पाणी टंचाई लक्षात घेता गावाला भेट देऊन टँकर सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती दिली. यानंतर तब्बल तीन तासानंतर ग्रामसेवकाची सुटका करण्यात आली.
या आंदोलनात तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्तराव पवार, राजाराम पवार, सरपंच मोतीराम कोल्हे, कोंडीबा जंगले, माजी सरपंच सदाशिव भोसले, नितीन पवार, गंगाराम भोसले, बाबुराव भोसले, रामकीशन जंगले, सखाराम जंगले, अंजनाबाई माळवे, रंभाबाई हासले, वैशाली जंगले, छायाबाई जंगले, सुशिला जंगले, संगीता पवार, सागरबाई कोल्हे, मुक्ताबाई कोल्हे, जनाबाई भोसले, राधाबाई भोसले, भगवान भोसले, नारायण भोसले, बाळू सूर्यवंशी, राम कोल्हे, श्रीरंग भोसले, माधव सूर्यवंशी आदींचा सहभाग होता.