अपघात पाहण्यास चालक खाली उतरला अन स्वतःच्याच ट्रॅक्टरखाली येऊन प्राणास मुकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 17:53 IST2022-01-13T17:51:11+5:302022-01-13T17:53:34+5:30
उतारावरील ट्रॅक्टर अचानक सुरु झाला, ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात चालकाने जीव गमवला

अपघात पाहण्यास चालक खाली उतरला अन स्वतःच्याच ट्रॅक्टरखाली येऊन प्राणास मुकला
पाथरी ( परभणी ) : अपघातग्रस्त ट्रॅक्टर पाहण्यास खाली उतरलेला चालक उतारावरून घसरत आलेल्या स्वतःच्याच ट्रॅक्टर खाली येऊन प्राणास मुकल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास पाथरी तालुक्यातील नाथरा शिवारात घडली. गोकुळ भीमराव इंदूरके ( २६) असे मृत चालकाचे नाव आहे.
पाथरी तालुक्यातील नाथरा शिवारातील जांभळी नाल्याजवळ बुधवारी सायंकाळी एक ट्रॅक्टर उलटला होता. याच रस्त्यावर सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास मुरूम वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जात होता. चालक गोकुळ भीमराव इंदूरके याने समोरील दृश्य पाहून अपघातग्रस्त ट्रॅक्टर पाहण्यासाठी स्वतःचे ट्रॅक्टर रस्त्यावर उभा केले. खाली उतरून गोकुळ उलटलेला ट्रॅक्टर पाहण्यासाठी जात होता. याचवेळी रस्त्यात उताराला उभा केलेला त्याचा स्वतःचा ट्रॅक्टर अचानक सुरू झाला.
हे लक्षात येताच गोकुळ ट्रॅक्टरच्या दिशेने धावत गेला. बंद करण्यासाठी ट्रॅक्टरच्या समोरील बाजूकडून तो वर चढण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, वर चढण्यास अपयशी ठरत तो ट्रॅक्टर खाली आला आणि मृत्युमुखी पडला. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात छत्रभुज धरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गंगलवाड करत आहेत.