कोरोनाकाळात घटले डॉक्टरांचे वजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:18 IST2021-05-26T04:18:21+5:302021-05-26T04:18:21+5:30

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात सर्वात जास्त कामाचा ताण जिल्हा रुग्णालय तसेच शासकीय कोविड सेंटरमध्ये ...

Doctor's weight lost during coronation! | कोरोनाकाळात घटले डॉक्टरांचे वजन!

कोरोनाकाळात घटले डॉक्टरांचे वजन!

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात सर्वात जास्त कामाचा ताण जिल्हा रुग्णालय तसेच शासकीय कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही पडला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्यांच्यावर सुटी न घेता दररोज दाखल होणारे रुग्ण तपासण्याची वेळ येत आहे. यात डॉक्टरांना त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देण्यास वेळही मिळत नाही. अशावेळी स्वत:च्या प्रकृतीपेक्षा रुग्ण बरे करण्यास प्राधान्य देणाऱ्या अनेक डॉक्टरांचे वजन या धकाधकीच्या आणि टेन्शनच्या काळामध्ये घटले आहे. तसेच काहीजणांंनी स्वत:हून आपले वजन कमी करून संतुलित आहार घेण्यास प्राधान्य दिले आहे.

जिल्हा रुग्णालय - १

डॉक्टर्सची संख्या - ८०

आरोग्य कर्मचारी - ७५०

दररोजच्या आहारामध्ये प्रथिनेयुक्त व क्षारयुक्त पदार्थ घेतो. यात मोड आलेले धान्य, पालेभाज्या यांचा सर्वात जास्त वापर करतो. सकाळी व्यायामानंतर रुग्णालयात येताना परिपूर्ण जेवण करतो. सध्या कामामुळे दोनवेळच्या जेवणामध्ये बरेच अंतर पडत आहे. तरी एकदा केलेल्या जेवणानंतर दिवसभर तोेच स्टॅमिना टिकवून ठेवतो. अद्याप वजनावर फरक पडलेला नाही.

- डॉ. रामेश्वर नाईक.

आहाराच्या निश्चित वेळा ठरवून देत त्यावेळी जेवणाचा प्रयत्न करतो. दररोज पेंडखजूर, सफरचंद यांचा समावेश दिवसभराच्या आहारासोबत रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी करत आहे. बाहेरील अन्नपदार्थ पूर्णपणे खाणे टाळले आहे. तसेच च्यवनप्राश आणि सुवर्णकल्प नित्यनेमाने घेत आहे.

- डॉ. नरेंद्र ब्रम्हपूरकर.

रुग्ण तपासण्याचा ताण सतत सहन करण्यासाठी आमची प्रकृती जपण्याचा प्रयत्न आम्हाला करावा लागतोय. यासाठी नियमित वेळेवर जेवण करणे, ज्यात शिळे आणि बाहेरील अन्नपदार्थ पूर्णपणे टाळले आहेत. व्हिटॅमीन सी आणि दूध, फळे यांचा वापर जेवणासोबत दिवसभरात जास्त प्रमाणात करतो. सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी प्राणायाम, योगासन करतो. तसेच नियमित माॅर्निंग वाॅकही करतो. - डाॅ. दुर्गादास पांडे.

आहाराची अशी घेतली जाते काळजी

सध्या जिल्हा रुग्णालयासह खासगी डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला आहे. यामुळे त्यांचे कामाचे तास अनिश्चित झाले आहेत. पूर्वीसारखे नियोजित वेळापत्रक राहिले नाही. यामुळे अनेक डॉक्टर सकाळी घरातून निघताना पोटभर जेवण करत असल्याचे काही डॉक्टरांनी सांगितले. कोरोनामुळे तर अनेकांची दिनचर्याच बदलली आहे. यामध्ये सकाळी लवकर उठल्यावर व्यायाम, योगासन, प्रामायाम आणि त्यानंतर कडधान्याचा समावेश असलेली उसळ, काढा यांचे सेवन केले जात आहे. दुपारचे जेवण कामाच्या गडबडीत करण्यास वेळ मिळत नसल्याने एकदा घराबाहेर पडताना पोटभर जेवण आणि मग परत रात्री घरी आल्यावर जेवण, असा दिनक्रम डॉक्टरांचा झाला आहे.

Web Title: Doctor's weight lost during coronation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.