दिवाळीचा आनंद हिरावला! सेलूमध्ये एकाच रात्री तीन घरफोड्या उघडकीस, लाखोंचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 11:24 IST2025-10-27T11:23:29+5:302025-10-27T11:24:07+5:30
सेलूमध्ये सणाच्या तोंडावर एकाच रात्रीत तीन घरफोड्या; ४ लाखाहून अधिक सोन्यावर चोरट्यांनी मारला डल्ला

दिवाळीचा आनंद हिरावला! सेलूमध्ये एकाच रात्री तीन घरफोड्या उघडकीस, लाखोंचा ऐवज लंपास
- रेवणअप्पा साळेगावकर
सेलू (परभणी) : सेलू शहरातील गोकुळनगर भागात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एकाच रात्रीत तीन घरफोडीच्या घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रवि गौतम बंदुके यांच्या घरातून चोरट्यांनी तब्बल 47.150 ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत 4 लाख 24 हजार) लंपास केल्याचा प्रकार रविवारी रात्रीसमोर आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोंडाला रूमाल बांधलेले चार चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रवि बंदुके हे दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी गेले होते. ते रविवारी रात्री घरी परतले असता दरवाज्याचे कुलूप तुटलेले आणि दरवाजा उघडा आढळला. घरातील कपाटातील कपडे विखुरलेले दिसल्याने चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तत्काळ सेलू पोलिस ठाण्यात माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिपककुमार वाघमारे, पोलिस निरीक्षक दिपक बोरसे, तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक बलभिम राऊत यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता शनिवारी मध्यरात्री १ वाजून ४८ मिनिटांनी तोंडाला रूमाल बांधलेले चार चोरटे कंपाऊंड वॉलवरून उडी घेत प्रवेश करताना आढळले. दरवाजाचे कुलूप तोडून तिघांनी घरात प्रवेश केला तर चौथा चोरटा बाहेर पहारा देताना दिसतो. चोरट्यांनी घरातील तब्बल 47.150 ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत 4 लाख 24 हजार ) लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे.
एकाच रात्री तीन घरफोड्या उघडकीस
या प्रकरणी रवि बंदुके यांच्या तक्रारीवरून अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याच परिसरातील गोकुळनगर मधीलच विकास साळवे व रमेश रणखाब यांच्या देखील बंद घरांचे कुलूप तोडून चोरी झाल्याचे उघड झाले आहे. बाहेरगावी गेलेले हे दोघेही परत आल्या नंतरच त्यांच्या घरातील चोरीचा तपशील समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या सलग घरफोड्यांमुळे गोकुळनगर परिसरात चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांनी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविणे व घरांचे कुलूप बळकट करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.