जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:17 IST2021-05-23T04:17:02+5:302021-05-23T04:17:02+5:30
परभणी : कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घटला असून, शनिवारी ७ हजार २४२ तपासण्यांमध्ये २२० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले ...

जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांवर
परभणी : कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घटला असून, शनिवारी ७ हजार २४२ तपासण्यांमध्ये २२० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्क्यांपर्यंत घटला आहे.
मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोना चाचण्या वाढविल्यानंतरही रुग्णांचे प्रमाण वाढलेले नाही. दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्क्यांपर्यंत वाढला होता; मात्र तो आता ३ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. शनिवारी आरोग्य विभागाला ७ हजार २४२ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात २२० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या ७ हजार ६१ तपासण्यांमध्ये १९८ आणि रॅपिड टेस्टच्या १८१ तपासण्यांमध्ये २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोना संसर्ग घटल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ४७ हजार ८६१ झाली असून, त्यापैकी ४३ हजार ६८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार १९० रुग्णांचा कोरोनाने आतापर्यंत मृत्यू झाला. सध्या २ हजार ९८५ रुग्ण उपचार घेत आहेत.
आठ रुग्णांचा मृत्यू
बाधित रुग्णांची संख्या घटली असली तरी कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. शनिवारी ८ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. येथील आयटीआय हॉस्पिटलमध्ये १, जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात ३ आणि खासगी रुग्णालयात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्या ८ रुग्णांमध्ये ६ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे.