ग्रामस्थांशी बेइमानी! दीडकोटींच्या विकास निधीचा अपहार; सरपंचासह पती, ग्रामसेवकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 14:14 IST2025-01-20T14:14:04+5:302025-01-20T14:14:39+5:30
गावासाठी आलेल्या दीड कोटींचा अपहार; सरपंचासह पती, ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

ग्रामस्थांशी बेइमानी! दीडकोटींच्या विकास निधीचा अपहार; सरपंचासह पती, ग्रामसेवकावर गुन्हा
मानवत (जि. परभणी) : शासनाकडून वेगवेगळ्या योजनांत मिळालेल्या एक कोटी ४१ लाख रुपयांचे संगनमत करून अपहार केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार कुंभारी ग्रामपंचायतीचे सरपंच, त्यांचे पती व ग्रामसेवक या तिघांविरुद्ध शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील वांगी-कुंभारी ग्रामपंचायतीच्या सरपंच नीता नंदकुमार चौधरी, त्यांचे पती नंदकुमार चौधरी व ग्रामसेवक मन्नथ साखरे यांनी संगनमत करून फेब्रुवारी २०२१ पासून ते आजतागायत शासकीय निधीतून अपहार केला. वांगी-कुंभारी ग्रामपंचायतीचे शासनाकडून वेगवेगळ्या योजनांत एक कोटी ४१ लाख एवढी रक्कम प्राप्त झाली असून, सरपंच नीता चौधरी यांच्याऐवजी नंदकुमार चौधरी हेच सह्या करतात. त्याद्वारे त्यांनी अनेक नियमबाह्य कामे केली आहेत. कागदपत्रांवर दाखवलेल्या खर्चाच्या प्रत्यक्ष चांगल्या प्रतीची कामे केलेली नाहीत. या संदर्भात गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्याकडे वारंवार लेखी तक्रार दाखल करण्यात आल्या; परंतु, या तक्रारीची गांभीर्यपूर्वक दखल घेण्यात आली नाही, असे फिर्यादीत म्हटले होते.
गुन्हा दाखल करण्याचे आदेश
मानवत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली. प्रकरणात सुनावणीत वांगी-कुंभारी ग्रामपंचायतीचे शासनाकडून वेगवेगळ्या योजनांत १ कोटी ४१ लाख एवढी रक्कम प्राप्त झाली. प्रकरणात वांगी-कुंभारी ग्रामपंचायतीचे सरपंच, त्यांचे पती व ग्रामसेवक यांनी संगनमत करून शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश मानवत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी जी. ए. करजकर यांनी दिले होते. यानुसार राधाकृष्ण मुळे यांच्या तक्रारीवरून सरपंच नीता चौधरी, त्यांचे पती नंदकुमार चौधरी आणि ग्रामसेवक मन्मथ साखरे यांच्याविरुद्ध १८ जानेवारीला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे अधिक तपास करीत आहेत.