तलावाच्या पाण्यात धुणे धुताना अनर्थ; दोन सख्ख्या बहिणी बुडाल्या, एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:07 IST2025-10-31T12:07:12+5:302025-10-31T12:07:27+5:30
जिंतूर तालुक्यातील घटना, शेजारील महिलांनी आरडाओरड केली असता गावातील नागरिक धावून आले आणि दोघींना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला.

तलावाच्या पाण्यात धुणे धुताना अनर्थ; दोन सख्ख्या बहिणी बुडाल्या, एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर
जिंतूर (जि. परभणी) : जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी गाव शिवारात असलेल्या तलावात धुणे धुताना दोन सख्ख्या बहिणी तळ्यात बुडाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी घडली. यात एकीचा मृत्यू झाला असून दुसरीची प्रकृती चिंताजनक आहे.
यात संध्या चव्हाण या मुलीचा मृत्यू झाला तर पूजा चव्हाण हिला पुढील उपचारासाठी परभणीला हलविण्यात आले. सातपूर, नाशिक येथे वास्तव्यास असलेले परमेश्वर बारकिराम चव्हाण हे कुटुंबासह आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी काही दिवसांपूर्वी मूळ गावी, कुऱ्हाडी येथे आले होते. लग्नसोहळा संपल्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांची विवाहित मुलगी पूजा परमेश्वर चव्हाण (२०) आणि अविवाहित मुलगी संध्या परमेश्वर चव्हाण (१७) या दोघी धुणे धुण्यासाठी गावशेजारील तलावावर गेल्या. धुणे धूत असताना दोघींचा पाय घसरून त्या तळ्यात पडल्या.
गावातील नागरिक धावून आले
शेजारील महिलांनी आरडाओरड केली असता गावातील नागरिक धावून आले आणि दोघींना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. काही वेळानंतर पूजा चव्हाण ही सापडली. तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, संध्या चव्हाण ही तळ्यातील खोल खड्ड्यात अडकल्याने तिला शोधण्यासाठी अर्धा तासाचा अवधी लागला. अखेर ती सापडल्यावर तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. पारवे यांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.