गंगाखेडमध्ये देशी कट्टा सापडला; उत्तर प्रदेशातील दोघांसह एकजण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 17:58 IST2019-12-21T17:54:41+5:302019-12-21T17:58:20+5:30
मोतीराम नगर परिसरातून तिघे ताब्यात

गंगाखेडमध्ये देशी कट्टा सापडला; उत्तर प्रदेशातील दोघांसह एकजण ताब्यात
गंगाखेड : शहरातील मोतीराम नगर परिसरात उत्तर प्रदेशातील दोन तरुणांकडे देशी बनावटीचे रिव्हॉल्वर सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उत्तर प्रदेशातील दोन व स्थानिक एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोतीराम नगर परिसरात काही तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती माहिती शुक्रवारी ( दि. २० ) रात्री १०:३० वाजेच्या सुमारास गंगाखेड पोलिसांना मिळाली. यानंतर पोलीस निरीक्षक वाय. एन. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विकास कोकाटे, पोलीस नाईक सुनील लोखंडे, राजेश मस्के, सय्यद उमर आदी कर्मचारी तत्काळ मोतीराम नगर परिसरात पोहोंचले. तेव्हा तेथील पप्पू सरदार याने हर्ष भुतडा या तरुणाने मला ठार मारण्याचा कट रचल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी परिसरातील दादाराव सखाराम कदम यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर धाड टाकली. यावेळी सुरजकुमार बोधीराम रघुवंशी (१९, रा. शिवनगर जि. सुलतानपुर उत्तर प्रदेश व विनोद धरमपाल यादव ( २०, रा. शहागंज जि. जौतपुर उत्तर प्रदेश) यांच्यासोबत हर्ष भुतडा (१९ वर्ष रा. व्यंकटेश नगर गंगाखेड ) हे तिघे संशयास्पद हलचली करताना आढळून आले.
पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता सुरजकुमार रघुवंशी याच्या कंबरेला देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आढळले. तर विनोद यादव याच्याजवळ धारदार चाकू आढळला. यानंतर पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरु आहे. याप्रकरणी सपोनि विकास कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी पहाटे तिन्ही तरुणांविरुध्द कलम १२० ब, सह कलम ३/२५, ४/२५ शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोनि बालाजी गायकवाड हे करीत आहेत. शहरात देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर सापडल्याने खळबळ उडाली आहे.