बियाण्यांसाठी केवळ १६७ शेतकऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:16 IST2021-05-23T04:16:51+5:302021-05-23T04:16:51+5:30
देवगांवफाटा: खरिपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना अर्ज एक योजना अनेक या तत्त्वावर महा डीबीटी पोर्टलवर बियाण्यांच्या नोंदणीसाठी अंतिम मुदत २० ...

बियाण्यांसाठी केवळ १६७ शेतकऱ्यांची मागणी
देवगांवफाटा: खरिपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना अर्ज एक योजना अनेक या तत्त्वावर महा डीबीटी पोर्टलवर बियाण्यांच्या नोंदणीसाठी अंतिम मुदत २० मे होती. परंतु, तालुक्यातील केवळ १६७ शेतकऱ्यांनीच अर्ज केले आहेत. त्यामुळे २४ मे पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी दिली.
खरीप हंगामासाठी शासनाच्या महा डीबीटी पोर्टल वर शेतकरी योजना या शीर्षकाखाली बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या योजनेची अंतिम मुदत २० मे होती.या मुदतीत सेलू तालुक्यातील ४७ गावामधून १६७ अशी अत्यल्प नोंदणी झालेली आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी कमी नोंदण्या आल्याने या योजनेला शासनाने आणखीन ४ दिवसांची मुदतवाढ दिली असून २४ मे पर्यंत शेतकऱ्यांना आता नोंदणी करता येणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांना खरिपासाठी सोयाबीन,मूग, उडीद, मका, बाजरी, इत्यादी बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.परंतु अंतिम मुदतीच्या आत सेलू तालुक्यात केवळ १६७ शेतकऱ्यांनी नोंदण्या केल्या. यामुळे शेतकरी उदासीन का जनजागृतीचा आभाव हे मात्र समजू शकत नाही. नोंदणीमध्ये वाढ व्हावी, यासाठी या योजनेला पुन्हा चार दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
जनजागृतीची गरज
सेलू तालुक्यात गतवर्षी ७० हजार शेतकरी यांनी पीकविमा भरला होता. त्या तुलनेत अनुदान तत्त्वावर बियाणे मिळण्यासाठी केवळ १६७ शेतकऱ्यांची नोंदणी केली आहे. आत्ता चार दिवसात किती वाढ होणार हे समोर येईल.
◼️८ च्या वर नोंदणी झालेले सहा गावं...
सेलू तालुक्यातील ४७ गावातील शेतकऱ्यांनी अनुदान तत्वावर बियाणेसाठी नोदणी केली आहे. यामध्ये केवळ सहा गावातील संख्या ८ च्या वर आहे.तर ४१ गावात १ किंवा दोन नोंदणी आहे. ती सहा गावे अशी वाई (३०),डिग्रस जहाँगीर (१६),पिंपळगाव गोसावी (११),नांदगाव (११), कुपटा (९),बोथ (८)
◼️शासनाने लकी ड्रॉ पध्दतीने शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर बियाण्यांसाठी नोंदणी सुरू केली या योजनेचा सेलू तालुक्यातील जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे.
आनंद कांबळे
तालुका कृषी आधिकारी,सेलू