परभणीतील जिल्हा रुग्णालयात कैद्याचा उपचारा दरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 19:13 IST2019-01-21T19:07:47+5:302019-01-21T19:13:06+5:30
दोन वर्षापूर्वी एका फसवणूक प्रकरणामध्ये सुग्रीव गायकवाड यांना अटक झाली होती.

परभणीतील जिल्हा रुग्णालयात कैद्याचा उपचारा दरम्यान मृत्यू
परभणी- येथील जिल्हा कारागृहातील एका कैद्याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ४.१५ वाजेच्या सुमारास घडली.
सुग्रीव गोपाळराव गायकवाड (६०) असे मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव असून फसवणूक प्रकरणामध्ये तो शिक्षा भोगत होता, अशी माहिती मिळाली. येथील जिल्हा कारागृहातील सुग्रीव गोपाळराव गायकवाड या कैद्यास मागील काही महिन्यांपासून विविध आजारांचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारही सुरु होते.
आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहात झालेल्या राऊंडमध्ये सुग्रीव गायकवाड यांनी त्रास होत असल्याचे नमूद केले. त्यामुळे गायकवाड यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच सायंकाळी ४.१५ वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. साधारणत: दोन वर्षापूर्वी एका फसवणूक प्रकरणामध्ये सुग्रीव गायकवाड यांना अटक झाली होती. या प्रकरणात ते शिक्षा भोगत होते.