आईसमोरच मुलाचा मृत्यू; दसऱ्याचे कपडे धुण्यासाठी आईची मदत करणारा तरुण नदीत बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 19:50 IST2022-09-26T19:50:13+5:302022-09-26T19:50:39+5:30
दसऱ्याचे कपडे धुणे जीवावर बेतले; दुधना नदीत बुडून युवकाचा मृत्यू

आईसमोरच मुलाचा मृत्यू; दसऱ्याचे कपडे धुण्यासाठी आईची मदत करणारा तरुण नदीत बुडाला
सेलू (परभणी) : आईसोबत दसऱ्याचे कपडे धुण्यासाठी दुधना नदी पाञात गेलेल्या एका युवकाचा पाण्यात बुडून मुत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मोरेगाव येथे दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. रवि प्रकाश काकडे (२२) असे मृताचे नाव आहे.
निम्न दुधना प्रकल्पाचे दरवाजे उघडून नदीपात्रात सतत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे दुधना नदीपात्र वाहते झाले आहे. मोरेगाव येथील रवि प्रकाश काकडे (२२) हा आईसोबत दसऱ्यानिमित्त कपडे धुण्यासाठी दुधना नदीवर आले होते. यावेळी अचानक पाय घसरून रवि नदी पात्रातील खड्ड्यात पडला. मुलगा पाण्यात बुडत असल्याचे दिसताच आईने आरडाओरड केली. ग्रामस्थांनी नदीपात्रात उतरून शोधा घेतला असता खड्ड्यातून रविला बाहेर काढण्यात आले. सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे डाॅक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. मृताच्या पश्चात आई, वडील एक भाऊ असा परिवार आहे.