दयामाया हरवली! पोटात बाळ घेऊन प्रवास पण जन्मताच ट्रॅव्हलमधून फेकलं; खुनाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:38 IST2025-07-18T16:37:43+5:302025-07-18T16:38:54+5:30
ट्रॅव्हलमधून फेकलेल्या बाळाच्या हत्येचा पोलिसांनी लावला छडा

दयामाया हरवली! पोटात बाळ घेऊन प्रवास पण जन्मताच ट्रॅव्हलमधून फेकलं; खुनाचा गुन्हा दाखल
पाथरी (जि. परभणी) : समाजाच्या भीतीपोटी पोटात बाळ घेऊन प्रवास करणाऱ्या निर्दयी महिलेनं, प्रवासादरम्यानच जन्मलेलं बाळ ट्रॅव्हल बसमधून थेट रस्त्यावर फेकून दिल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पाथरी-सेलू रस्त्यालगत मंगळवारी सकाळी एका धावत्या ट्रॅव्हलमधून नवजात अर्भक रस्त्यावर फेकल्याने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी आता दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळाला काळसर कपड्यांमध्ये गुंडाळून फेकण्यात आलं होतं. काही सजग नागरिकांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत, संबंधित ट्रॅव्हलचा शोध घेऊन परभणी येथे दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
अखेर खुनाचा गुन्हा दाखल
प्रसूतीनंतर आरोपी महिला रुग्णालयात उपचार घेत असून दुसऱ्या आरोपी अल्ताफ मेहनुदिन शेख याला अटक करण्यात आली. अर्भकाच्या शवविच्छेदन अहवालात डोक्यावर गंभीर मार असल्याचे निष्पन्न झाले. यावरून केवळ बाळ फेकल्याचे नव्हे, तर ठार मारल्याचेही स्पष्ट झाल्याने पोलिसांनी गुन्ह्यात खुनाचा कलमाचा समावेश केला आहे. आरोपीला पाथरी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
डीएनए चाचणीकडे लक्ष
तपासात दोघेही पती-पत्नी असल्याचे ते सांगत आहेत, मात्र अद्याप याचा कोणताही ठोस पुरावा पोलिसांकडे नाही. डीएनए चाचणीसाठी अहवाल पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी बाळाचे अंत्यसंस्कार मातेला देण्यात आलेल्या ताब्यानंतर पार पडले.
समाजात उद्विग्न भावना
ही घटना केवळ एक गुन्हा नसून समाजातील जबाबदाऱ्या झटकण्याची आणि बाळावर अन्याय करण्याची क्रूर मानसिकताही दर्शवते. पोटात जपलेलं बाळ, प्रवासात जन्मलं, पण त्याच क्षणी जगातून निघून गेलं. यावर कोणताही शब्द पुरेसा नसल्याच्या उद्विग्न भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
पोलिसांची तत्परता कामी आली..
घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत छडा लावला. आरोपीला अटक केली. तपास पोलिस उपनिरीक्षक माजी शेख यांनी केला. घटनेत खुनाचे कलम वाढ झाल्याने आता तपास पोलिस निरीक्षक महेश लांडगे करत आहेत.