वडिलांचे स्वप्न लेकीने पूर्ण केले; मेघना बोर्डीकर मंत्रिमंडळात, जिंतूरमध्ये जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 19:05 IST2024-12-16T19:03:33+5:302024-12-16T19:05:37+5:30

४२ वर्षांनंतर जिंतूर तालुक्याला मिळाले मंत्रिमंडळात स्थान

Daughter fulfills father's dream; Meghna Bordikar joins cabinet, joy in Jintur | वडिलांचे स्वप्न लेकीने पूर्ण केले; मेघना बोर्डीकर मंत्रिमंडळात, जिंतूरमध्ये जल्लोष

वडिलांचे स्वप्न लेकीने पूर्ण केले; मेघना बोर्डीकर मंत्रिमंडळात, जिंतूरमध्ये जल्लोष

जिंतूर : वर्षानुवर्षे सातत्याने हुलकावणी देणारे मंत्रिपद अखेर मेघना बोर्डीकर यांना मिळाल्याने त्यांच्या वडिलांचे स्वप्न लेकीने पूर्ण केले आहे. आ. मेघना बोर्डीकर यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने जिंतूर मतदारसंघात जल्लोष साजरा केला जात आहे.

जिंतूर तालुक्याला मंत्रिपद मिळावे ही मागच्या अनेक वर्षांपासून बोर्डीकर परिवाराची इच्छा आ. मेघना बोर्डीकर यांच्या रूपाने पूर्ण झाली आहे. १९९० पासून माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून आमदारकी मिळवताना मंत्रिपदाची आस लावून होते. प्रत्येक वेळी शपथविधीला आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी आशा असताना अनेक वेळा त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. त्यानंतर त्यांची मुलगी मेघना दीपक साकोरे- बोर्डीकर या राजकारणात आल्या. त्यांनी २०११ मध्ये जिल्हा युवक युवती काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद भूषवले. तेथूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. २०१२ ते १७ या पंचवार्षिक योजनेमध्ये मेघना बोर्डीकर यांचा खऱ्या अर्थाने पहिल्यांदा राजकारणात प्रवेश झाला असेच म्हणावे लागेल. बोरी जि. प. सर्कलमधून त्या पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.

त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीमध्ये त्यांनी विधानसभा लढवली पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उभे राहून त्यांनी यश संपादन केले होते. खऱ्या अर्थाने परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची मुहूर्तमेढ त्यांच्या रूपाने जिल्ह्याला मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सातत्याने पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला. २०२४ च्या निवडणुकीमध्ये परत एकदा आमदारकी मिळवल्यानंतर मंत्रिपदामध्ये त्यांचा नंबर लागेल असा विश्वास मतदारसंघातील कार्यकर्त्यांना होता नव्हे तर एका उच्चशिक्षित असणाऱ्या महिला आमदारास मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या देवस्थानाला नवस बोलले. दरम्यान, आ. बोर्डीकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होताच तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

अन् मुख्यमंत्र्यांचा फोन आला
मंत्रिमंडळ शपथविधीच्या अवघ्या काही तासांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघना बोर्डीकर यांना फोन करून मंत्रिमंडळ समावेश असल्याची गोड बातमी दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष झाला.

ते स्वप्न पूर्ण झाले
माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांनी १९९० च्या निडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी राज्यामध्ये सरकार स्थापनेसाठी काँग्रेस पक्षाला काठावरचे बहुमत हवे होते. काही अपक्षांचा टेकू हवा होता. त्यावेळी रामप्रसाद बोर्डीकर यांनी अकरा आमदारांचा एक गट तयार करून सरकारला पाठिंबा दर्शविला होता. त्याचवेळी माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, असे सर्वांना वाटत होते. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांचे नाव बाजूला गेल्याने त्यांचे मंत्रिपदाचे स्वप्न अधुरे राहिले हेच स्वप्न त्यांची लेक आ. मेघना बोर्डीकर -साकोरे यांनी पूर्ण केले.

विकासाला चालना मिळणार
जिंतूर विधानसभा मतदारसंघात सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आ. मेघना बोर्डीकर यांच्या रूपाने जिल्ह्याला मंत्रिपद मिळाल्याने तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

'इंटरनॅशनल स्टडीज'मध्ये एम. ए; दुसऱ्यांदा आमदार
मेघना बोर्डीकर या २०१९ व २०२४ असे सलग दोनदा परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघातून भाजपकडून निवडून आल्या आहेत. भाजपने त्यांना यावेळी मंत्रिपदाची संधी दिली. २०१२ मध्ये परभणी जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून त्यांनी राजकीय जीवनात पाऊल ठेवले. त्यानंतर सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालकही आहेत. त्यांचा जन्म १० एप्रिल १९८० रोजीचा असून, जिंतूर तालुक्यातील बोर्डीच्या आहेत. त्यांनी बी. एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स), एम. ए. (इंटरनॅशनल स्टडीज) असे उच्च शिक्षण घेतले आहे. आमदार असताना इतर विकासकामांसोबतच मृद व जलसंधारणासाठी विशेष प्रयत्न, महिला व युवकांसाठी रोजगार कार्यक्रम, व्यसनमुक्ती व पुनर्वसन कार्यक्रम राबविण्यावर भर दिला. वडील रामप्रसाद बोर्डीकर चारदा आमदार व मुंबई बाजार समितीचे सभापती राहिले आहेत.

Web Title: Daughter fulfills father's dream; Meghna Bordikar joins cabinet, joy in Jintur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.