सेलू शिवारातील शेत आखाड्यावर धाडसी चोरी; कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण

By ज्ञानेश्वर भाले | Updated: November 16, 2023 16:44 IST2023-11-16T16:44:28+5:302023-11-16T16:44:47+5:30

पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध नोंदवला गुन्हा

Daredevil robbery at farm arena in Selu Shiwar; Family members are brutally beaten | सेलू शिवारातील शेत आखाड्यावर धाडसी चोरी; कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण

सेलू शिवारातील शेत आखाड्यावर धाडसी चोरी; कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण

सेलू (जि.परभणी) : सेलू शहराजवळील केवारे यांच्या शेत आखाड्यावर मंगळवारी रात्री चोरट्यांनी धुडगूस घालत कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण करून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरुन नेल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात २२ तासानंतर ४ अज्ञात आरोपिविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सेलू शेतशिवारात केवारे यांची शेती रामदास प्रभु चव्हाण यांनी ठोक्याने कसण्यासाठी घेतली. ते पत्नी, सुन व नात असे आखाड्यावरील घरात राहत असत १४ नोव्हेंबरला रात्री साडेनऊला चार अनोळखी इसमांनी संगणमत करून या आखाड्यावरील घरात घुसुन रामदास चव्हाण यांना पैशाची मागणी केली, त्यांनी देण्यास नकार देताच त्यास काठीने मारहान केली व त्यांचे पत्नीचे गळ्यातील सोन्याचे मनी, डोरले पिंपळपान (किंमत १६ हजार) हिसकावून घेतले.

पत्नीने प्रतीकार केल्याने तीला चाकुने दोन्ही तळहाताला मारून जखमी केले व रामदास चव्हाण यांना काठीने उजव्या हाताच्या मनगटावर व डाव्या पायाच्या नळीवर, घोट्यावर मारहान केली ही घटना पुढे आली. रामदास चव्हाण यांचे फिर्यादीवरून दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सायंकाळी ७ वा. सेलू ठाण्यात चार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. सपोनी एस.टी. चव्हाण तपास करीत आहेत. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ओव्हळ, पो.नि. समाधान चवरे, सपोनी एस.टी. चव्हाण, पोउपनी अशोक जटाळ, पोलीस हवालदार जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परंतु अद्यापही चोरट्यांचा शोध पोलीसांना लागला नाही.

Web Title: Daredevil robbery at farm arena in Selu Shiwar; Family members are brutally beaten